मुंबई : मुंबईत शनिवारी २,२८२ करोनाबाधितांची नोंद झाली असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या दोन लाखांनजीक पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग गेल्या आठवडय़ात काहीसा कमी झाला. मात्र वांद्रे पश्चिम, बोरिवली, अंधेरी पश्चिम, दहिसर, कांदिवली, गोरेगाव या भागांत वेगाने रुग्णवाढ होत आहे. शनिवारी मुंबईतील १९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७४९ म्हणजेच ८१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २८,५६८ रुग्ण उपचाराधीन आहेत. एका दिवसात बाधितांच्या संपर्कातील १५ हजार लोक शोधण्यात आले आहेत. त्यापैकी २०८२ जणांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

देशात दिवसभरात ८५ हजारांहून अधिक करोनाबाधित

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ८५ हजारांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, एकूण रुग्णसंख्या ५९ लाखांहून अधिक झाली आहे. याच कालावधीत ९३,४२० लोक बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ४८ लाखांहून अधिक झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.एका दिवसात ८,५३६२ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने देशातील करोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या ५९,०३,९३२ इतकी झाली. २४ तासांच्याच कालावधीत १०८९ लोकांचा मृत्यू ओढवल्यामुळे करोना मृत्यूंचा आकडा ९३,३७९ इतका झाला आहे.

राज्यात १० लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

मुंबई : राज्यात लागोपाठ चौथ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात १० लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे होण्याचा टप्पा शनिवारी गाठल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यात २०,४१९ नव्या रुग्णांचे निदान झाले तर ४३० जणांचा मृत्यू झाला. याच काळात २३,६४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख २१ हजार झाली असून, यापैकी १० लाख १६ हजार रुग्ण बरे झाले आहेत. एकू ण रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण हे ७७ टक्के असल्याची माहिती टोपे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ३५,१९१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ६९ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात नाशिक १५९५, पुणे शहर १७९६, पिंपरी-चिंचवड ११३८, उर्वरित पुणे जिल्हा १३९०, सोलापूर ७०३, सांगली ७७९, सातारा ८४९, नागपूर १६३५ नव्या रुग्णांची नोंद झाली.