आतापर्यंत ३ लाख २१ हजार प्रवासी परतले; उत्तर प्रदेश, बिहार, अमृतसरमधून सर्वाधिक गाडय़ा

मुंबई : टाळेबंदीमुळे रोजगार बुडू लागल्याने मुंबापुरी सोडून आपल्या गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांनी आता पुन्हा एकदा मायमुंबईच्या दिशेने कूच केले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष गाडय़ांमधून गेल्या २४ दिवसांत मुंबई महानगर परिसरात ३ लाख २१ हजार ९५० जणांनी ‘कामवापसी’ के ली आहे. उत्तर प्रदेश, बिहार,अमृतसर, जोधपूरमधूनच सर्वाधिक जण मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेलमध्ये दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.

करोनाचे सावट, काम गेल्याने उपासमारीची आलेली वेळ, घराची ओढ अशा विविध कारणांमुळे टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी व नंतरही लाखो परप्रांतीय कामगारांनी गावचा रस्ता धरला होता. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्याने काम देणाऱ्या एमएमआरडीएसारख्या सरकारी आस्थापना, खासगी कं पन्या, व्यावसायिक आता या कामगारांना कामावर बोलावू लागले आहेत. त्यामुळे आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रेल्वेने १ जूनपासून विशेष गाडय़ा सोडायला सुरुवात के ल्यापासून ३० जूनदरम्यान २६ लाख प्रवाशांनी गाडय़ांकरिता आगाऊ आरक्षण के ले होते. विशेष गाडय़ांमधील विनावातानुकू लित आणि वातानुकू लित डबे तसेच आसन प्रकारातील सामान्य डबेही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले. फक्त निश्चित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश देण्यात आला.

पश्चिम आणि मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीत मुंबईतूनही अनेक गाडय़ा सुटल्या व दाखल झाल्या. १ ते २४ जून या कालावधीत एकू ण ३ लाख २१ हजार ९५० जण मुंबईत परतले. पश्चिम रेल्वेवर १ लाख ८१ हजार ९५० तर मध्य रेल्वेवर सुमारे १ लाख ४० हजार प्रवासी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर पनवेल, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी येथून अनेक प्रवासी उतरले. वाराणसी, गोरखपूर, लखनौ, पटणा, दरभंगा, पाटलीपुत्र येथून प्रत्येक दिवशी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रत्येकी दोन गाडय़ा येत होत्या. तर भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, हैदराबाद येथूनही विशेष गाडय़ांमधून प्रवासी परतले. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस येथे जोधपूर, अमृतसर, गोरखपूर, मुझफ्फरपूर येथून मोठय़ा प्रमाणात प्रवासी आल्याची माहिती देण्यात आली.

पंजाब,राजस्थानातून प्रवासी

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीत गाडी क्र मांक २९२६ अमृतसर ते वांद्रे टर्मिनस या गाडीतून गेल्या २४ दिवसांत ३९ हजार ५२४ प्रवासी दाखल झाले. तर गाडी क्र मांक २४७९ जोधपूर ते वांद्रे टर्मिनस गाडीतून आतापर्यंत ३८ हजार ३७० प्रवासी आल्याची माहिती दिली.