News Flash

कळव्यात चारमजली बेकायदा इमारत जमीनदोस्त

कळव्यातील भुसार आळी परिसरात ३० वर्षांपासून उभी असलेली ‘अन्नपूर्णा’ ही चार मजली बेकायदा इमारत रविवारी मध्यरात्री पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

| November 19, 2013 03:18 am

कळव्यातील भुसार आळी परिसरात ३० वर्षांपासून उभी असलेली ‘अन्नपूर्णा’ ही चार मजली बेकायदा इमारत रविवारी मध्यरात्री पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मात्र तेथील हळदीच्या कार्यक्रमामुळे रात्री जाग असल्याने रहिवाशांनी इमारत कोसळण्यापूर्वीच बाहेर धाव घेतल्याने १२५ जणांचे प्राण बचावले.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शशिकांत तेलंगे यांच्या कुटुंबातील थोरल्या मुलाचा सोमवारी विवाह होता. रविवारी हळद लावण्याचा कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. इमारतीचा तळजमजल्यावरील आधारखांब खचत असल्याचे शशिकांत तेलंगे यांच्या लक्षात आले. कॉलम खचत असताना पहिल्या मजल्यावरील िभतींवरील माती वेगाने खाली पडत होती. तेलंगे यांनी लगेचच इमारतीमधील समीत चौधनकर आणि जयेंद्र आर्यमाने यांना जागे करून हा प्रकार दाखविला. त्यानंतर १० मिनिटांत त्यांनी सर्वाना जागे केले. पुढच्या १५ मिनिटांत येथील २५ कुटुंबे इमारतीबाहेर पडल्याने मोठी प्राणहानी टळली.
तेलंगे कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कोसळलेल्या इमारतीच्या जवळ धुळीचा लोट पसरला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. त्यामुळे रस्ता शोधताना काहींना किरकोळ दुखापत झाली. यामध्ये पोलीस शिपाई कांचन गोगले किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले असून नागरिकांना वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. ही इमारत महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती.
मुख्यमंत्र्यांकडून एक लाख
सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट देऊन येथे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबांला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय गेल्या पाच महिन्यांत मुंब्रा, कळवा परिसरांत कोसळलेल्या तीन इमारतींमधील कुटुंबांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
मौल्यवान वस्तूंसाठी सीसीटीव्ही
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली रहिवाशांच्या अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे ढिगारा उपसताना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून रहिवाशांना  संशय येऊ नये, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे. एखाद्या रहिवाशाची मौल्यवान वस्तू सापडल्यास कुटुंबीयांपर्यंत पोचती करण्यासाठी महापालिकेमार्फत खास कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत.

नव्या संसाराची अशीही सुरुवात..
अन्नपूर्णा इमारत दुर्घटनेत एकही बळी गेला नाही याचे श्रेय याच इमारतीत राहणाऱ्या डॉ. अवधूत तेलंगे या नववरास मिळाले. डॉ.अवधूत यांच्या हळदीच्या कार्यक्रमामुळे इमारतीची जीर्ण अवस्था वेळीच लक्षात आल्याने या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचविणे शक्य झाले. इमारत कोसळल्याने तेलंगे कुटुंबीयांसह या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या अन्य २४ कुटुंबीयांचा संसार विस्कटला. मात्र, या कटू आठवणींनी खचून न जाता डॉ. अवधूतचा लग्नसोहळा सोमवारी दुपारी निर्विघ्नपणे संपन्न झाला. नव्या संसाराचा डोलारा जुन्या संसाराच्या खचलेल्या पायावर उभा राहात असल्याचे पाहून लग्न करायचे की नाही, अशा विचारांचे काहूर रात्रभर डॉ. अवधूत यांच्या मनात सुरू होते. मात्र, घरातील लग्नसराईमुळे आपले आणि शेकडो जणांचे प्राण वाचले. त्यामुळे मोडलेल्या संसाराच्या दु:खापेक्षा हाहाकार माजविणारी दुर्घटना टाळल्याचा आनंद सोमवारी तेलंगे कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
अन्नपूर्णा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शशिकांत तेलंग, त्यांच्या पत्नी, डॉ. अवधूत तेलंगे आणि त्याचा धाकटा भाऊ पराग तेलंग असे चौघांचे कुटुंब राहते. अवधूत तेलंगे यांचे मुरबाड येथे राहणाऱ्या सोनाली तेलवणे हिच्यासोबत बदलापूर येथे लग्न होते. रविवारी हळदीच्या कार्यक्रमासाठी गावावरून तसेच बदलापूर येथून मित्रमंडळी आली होती. हळदीचा कार्यक्रम आणि त्यांच्यानंतरची जेवणावळ संपल्यानंतर गप्पा मारत असताना ही घटना घडली. त्यामुळे इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात या मंडळींना यश आले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याचे समाधान मानत लग्नाचा ठरलेला कार्यक्रम त्यांनी पूर्ण करायचे ठरवले.
अवधूत यांची बहीण अरुंणधती पालांडे याही कळवा परिसरातच राहत असल्याने तेलंगे कुटुंबीयांनी तेथे आसरा घेतला. धाकटा मुलगा पराग हा इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबला, तर अन्य कुटुंबीयांनी ठरल्याप्रमाणे बदलापूर येथील लग्न कार्यक्रम उरकले. ठाण्यातील घरात एकत्र राहण्याचे स्वप्न या नवदाम्पत्याने रंगविले होते. संसाराच्या पहिल्याच दिवशी नियतीने त्यांच्यावर आघात करत घराचे होत्याचे नव्हते केले. अवधूत यांचे बदलापूरमध्ये दुसरे घर असल्याने सध्या त्या घरामध्येच नव्या संसाराला सुरुवात करण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला आहे. इमारतीमधील अन्य शेजाऱ्यांचे घर तुटल्याचे दु:खदेखील या नवदाम्पत्याला आहे. मात्र लग्नाच्या कार्यक्रमामुळे सर्वाचे प्राण वाचवणे शक्य झाल्याचे समाधान या तेलंगे कुटुंबीयांना आहे.  

कळवा प्रभाग सहाय्यक आयुक्त जखमी
अन्नपूर्णा इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु असताना पाहणी करीत असलेल्या ठाणे महानगरपालिकेचे कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त घनश्याम थोरात यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते जखमी झाले. यामध्ये थोरात यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अन्नपूर्णा इमारत कोसळल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुपारी दुर्घटनास्थळी पोहचले. त्यावेळी त्यांची छायाचित्रे  काढण्यासाठी छायाचित्रकारांची झुंबड उडली होती. त्यापैकी काही छायाचित्रकार इमारतीच्या एक तुटक्या िभतीवर चढले होते.
ती भिंत अचानक खाली कोसळून खाली उभे असलेले थोरात यांच्या अंगावर पडली. त्यामध्ये त्यांचे दोन्हीपाय फ्रॅक्चर झाले अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2013 3:18 am

Web Title: 4th stored illegal building collapse in kalwa
Next Stories
1 परप्रांतीयांवरून शिवसेना लक्ष्य
2 भारनियमनाचे संकट?
3 विज्ञानात गुंतवणूक कमीच ; राव यांच्याशी संशोधक सहमत
Just Now!
X