धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारा तरूण अपघातातून थोडक्यात बचावला, मात्र तो विनातिकीट प्रवास करत असल्याचं लक्षात आल्यावर त्याच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात हा प्रकार घडला आहे. धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करणारा विकास गौड फलाटावरून घसरून पडला. सुदैवानं प्रसंगावधानता दाखवत तो फलाटामधल्या फटीतून बाहेर आला. लोहमार्ग पोलिसांनी प्राथमिक उपचारांसाठी त्याला फलाटावरील रेल्वे तिकीट तपासनीसांच्या कार्यालयात नेलं. यावेळी चौकशीदरम्यान त्याच्याकडे तिकीट नसल्याचं समोर आलं. विनातिकीट प्रवास करणाऱ्या विकास गौड करून रेल्वेनं चांगलाच दंड वसूल केला आहे.

कुर्ल्याचा रहिवासी असलेला विकास गौड विद्याविहार स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी तोल जाऊन तो खाली पडला. या अपघातातून तो थोडक्यात बचावला. संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी लोहमार्ग पोलीस मदतीला धावून आले. विकासला किरकोळ जखमा झाल्या होत्या. विकासची प्राथमिक चौकशी करताना त्याच्याजवळ तिकीट नसल्याचं लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब तिकीट तपासनीसांच्या निदर्शनास आणून दिली. विना तिकिट प्रवास करत असल्यानं त्याच्याकडून दंड आकारण्यात आला असल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.