राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूर आणि दुष्काळी स्थितीमुळे ४० टक्के जनता बाधित झालेली असल्याने याचिकेद्वारे ही विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सवामुळे थांबललेल्या विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आता काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे. यासाठीची सर्व पूर्वतयारीही झाल्याचे नुकतेच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच याला तुर्तास स्थगिती देण्यात यावी आणि निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह हरयाणा आणि झारखंडमध्ये हे वर्ष संपण्याआधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये मतदान आणि मतमोजणीची प्रक्रियाही पूर्ण होऊ शकते, असे काही माध्यमांनी म्हटले आहे.

सन २०१४मध्ये या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. तर १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले होते. त्यावेळी दिवाळी २३ ऑक्टोबर रोजी आली होती. तर झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान ५ टप्प्यांत मतदान पार पडले होते.