पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेच्या प्रवाशांचाही प्रवास लवकरच सुखद होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यापासून मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू असून प्रवासी संघटनांशी चर्चा केल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. परंतु गर्दीच्या वेळेतील म्हणजेच सकाळच्या तीन आणि संध्याकाळच्या तीन लोकल फेऱ्या रद्द करून त्याजागी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू करण्यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. मध्य रेल्वेला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत एसी गाड्यांचा पहिला रॅक मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चालवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी एसी लोकलचे दरवाजे उघडण्याच्या आणि बंद करण्याची वेळ कमी करण्यावरही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुंबई मिररने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एसी लोकलचे दरवाजे उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ कमी झाल्यास हार्बर मार्गावरही एसी लोकल सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो. असे झाल्यास सध्याच्या वेळापत्रकाला धक्का न लावता सीएसएमटी ते गोरेगाव आणि पनवेलदरम्यान एसी लोकल सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर 2017 मध्ये एसी लोकल सुरू करण्यात आली होती. त्यावेळी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी एक अशी सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर गर्दीच्या वेळी आणखी दोन आणि अन्य वेळेवर चार सेवा सुरू करण्यात आल्या.

‘भेल’कडून एसी लोकलचे एकूण 12 रॅक पुरवण्यात येणार आहेत. यापैकी 2 रॅक पश्चिम रेल्वेला मिळाले असून तिसरा रॅक जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर मध्य रेल्वेला ऑगस्ट महिन्यात पाच रॅक देण्यात येणार आहेत. त्यापैकी मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावर प्रत्येकी एक, हार्बर मार्गावर एक, ट्रांस हार्बर मार्गावर एक आणि एक रॅक राखीव ठेवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. या वर्षाच्या अखेरील मध्य रेल्वेला पाच एसी लोकल मिळणार आहे. त्यामुळे एसी लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर लवकरच काम सुरू केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी दिली.