आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेडय़ापाडय़ांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.

स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.

शेतकऱ्यांना सततच्या कर्जाच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच टाळेबंदी शिथिल के ल्यापासून सुमारे ५० ते ६० हजार उद्योग सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

करोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छतादूत हेच खरे कोविडयोद्धे आहेत. करोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. करोनाविरुद्धचा हा लढा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

रश्मी ठाकरे, मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच विविध विभागांचे अपर मुख्य सचिव यांच्यासह करोनावर मात केलेले कोविडयोद्धे या वेळी उपस्थित होते.

राज्यभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात

* राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह विविध मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

* मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेन्द्र भागवत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

* मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कोविडयोद्धय़ांचा ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.