वाहतूक विभागाने अपघातानंतर वाहनांचे ‘ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भायखळा येथे ‘क्रॅश अॅनालिसिस कंट्रोल रुम’ उभारण्यात येणार आहे. त्यात वाहन आणि रस्ते यांची योग्यता चाचणी पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे अपघाताचे मुख्य कारण समजण्यासह अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल, असा दावा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

शहरातील अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याने माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अपघात कसा झाला? कोणाच्या चुकीमुळे झाला? वाहनात काही दोष होता का? रस्ता खराब असल्याने अपघात झाला का? वाहनाची वेगमर्गादा किती होती? रस्त्यांची रचना आणि बांधकामात दोष होता का? अशा अनेक गोष्टींची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अपघाताचे मुख्य कारण समजण्यास मदत होईल आणि त्याआधारे अपघात रोखण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरता येईल असे मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे सह-पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

सध्या शहरात एखादा अपघात झाल्यास प्राथमिक अहवालात वाहन चालकाची चूक असल्याचे गृहीत धरूनच तथाकथित तपासाचा निष्कर्ष काढला जातो. मात्र रस्ते, उड्डाणपूल, वळणे यांचे सदोष बांधकाम तर जबाबदार असू शकते.
– विजश्री पेडणेकर, रस्ते अभ्यासक