दहा महिन्यांत पंधरा हजार प्रवाशांना दंड; बदलापूर, ठाणे, डोंबिवली, कल्याण आघाडीवर

मुंबई : पादचारी पूल, संरक्षक जाळ्या आदी उपाय योजूनही प्रवाशांकडून नियम धुडकावून व जिवाचा खेळ करत रूळ ओलांडण्याचे प्रकार सुरू राहिल्याने रेल्वेने अशा प्रवाशांवरील कारवाई तीव्र केली आहे. २०१९च्या जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल १५,६५१ जणांना रूळ ओलांडल्याबद्दल दंड करण्यात आला. या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार हजारने भर पडली आहे.

रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर धोकादायकही आहे. रूळ ओलांडू नये, कायद्याने गुन्हा आहे, अशा उद्घोषणा मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात होत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत प्रवासी सर्रास रूळ ओलांडून जातात. त्यामुळे अपघातांचाही धोका वाढतो. अपघातानंतर वाहतुक विस्कळीत होऊन बहुसंख्य प्रवाशांना विलंबाला सामोरे जावे लागते ते वेगळे. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांमार्फत विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. स्थानकात पुरेसे पादचारी पूल, रुळांशेजारीच संरक्षक जाळ्या, भुयारी मार्ग इत्यादी सुविधा पुरविल्या जात आहेत. याशिवाय कठोर कारवाईही केली जात आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये कारवाईच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते. मध्य रेल्वेवर २०१८ मध्ये ११,५६५ प्रकरणांमध्ये रूळ ओलांडणाऱ्यांना दंड करण्यात आला. तर दंड न भरल्याने ४५ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत रूळ ओलांडण्याच्या केलेल्या कारवाईत २०१९ मध्ये १५,६५१ प्रकरणे दाखल झाली आहेत. तर २० जणांना तुरुंगाची हवा खावी लागल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. उपनगरातील बदलापूर, ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतच रूळ ओलांडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत यंदा ३६,५२,४५० रुपये दंड वसूल करण्यात आला. २०१८ मध्ये ही रक्कम २४ लाख ६२ हजार रुपये इतकी होती.  बदलापूरमध्ये रूळ ओलांडण्याची २,००४ प्रकरणे दाखल झाली आहेत. गेल्या वर्षी याच भागांत १,४८७ प्रकरणांची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ सुरक्षा दलाच्या डोंबिवली पोस्टमध्ये १,६११ प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षी हीच नोंद १,०७२ एवढी होती. ठाण्यात १,२५५, दिव्यात १,१८७, कल्याणमध्ये १,६४३, सीएसएमटीत ८७३, कुल्र्यात ६७७ प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. अन्य काही स्थानक हद्दीतही मोठय़ा प्रमाणात रूळ ओलांडण्याचे प्रकार घडतात.