राज्यातील महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी औष्णिक विद्युत प्रकल्पांतील संचांच्या उभारणीसाठीच्या २३ हजार १११ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

चंद्रपूर येथील विस्तारित विद्युत प्रकल्पातील ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच उभारणीसाठी शासनाने यापूर्वी २००८ मध्ये ५०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. मात्र दोन्ही संचांच्या उभारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी लागणाऱ्या ७ हजार ४ कोटी ४२ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

कोराडी येथील विद्युत प्रकल्पातील तीन संच उभारणीसाठी २ हजार १४६ कोटी ५९ लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली. परळी प्रकल्पातील जुन्या संचांच्या जागी २५० मेगावॅट क्षमतेचे नवीन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या २ हजार ८१ कोटी रुपये वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन परळी, पारस आणि भुसावळ येथील विद्युत प्रकल्पांच्या जुन्या झालेल्या संचांच्या जागी २५० मेगाव्ॉट क्षमतेचे नवीन संच उभारणीसाठी व भागभांडवल उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने २००९ मध्ये मान्यता दिली होती. हा प्रकल्प नोव्हेंबर २०१६ मध्ये पूर्ण झाला. त्यासाठी झालेल्या वाढीव खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.