पनवेल दिवाणी न्यायालयाने अतिरिक्त न्यायाधीश प्रदीम मोराळे यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली असून असमाधानकारक कामगिरीच्या कारणास्तव त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
पनवेल येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्य केलेल्या मोराळे यांची दिवाणी न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र प्रोबेशन कालावधीत त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या महानिबंधक (रजिस्ट्रार जनरल) शालिनी जोशी-फणसाळकर यांनी दिली. मोराळे यांच्या प्रोबेशन कालावधीत वाढ करण्यात आली होती.
मात्र त्यातही त्यांना समाधानकारक कामगिरी करता न आल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोराळे यांच्या कार्यपद्धतीविषयी वकिलांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यांच्याविरुद्ध अन्य काही आक्षेपही नोंदविण्यात आले होते. त्याच पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.