धारावीपाठोपाठ दादरमध्येही २४ तासांत नवीन रुग्ण नाही

मुंबई : मुंबईतील मुख्य बाजारपेठांपैकी एक असलेल्या दादरमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात पालिकेला हळूहळू यश येत आहे. शनिवारी दादरमध्ये एकही करोनाबाधित आढळून आला नाही. त्यामुळे दादरची वाटचालही करोनामुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून दादरमधील मध्यवर्ती बाजारपेठेत भल्या पहाटे भाजीपाला विक्रीस येतो. रेल्वे स्थानकाबाहेरील फुलबाजारातही प्रचंड वर्दळ सुरू होते. परिणामी, पहाटेपासूनच दादर गर्दीने फुलून जातो.

दादरमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने फुलगल्ली, भाजी बाजार आदी ठिकाणचे विक्रेते, फेरीवाले, मेट्रोचे कर्मचारी, हॉटेलमधील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, कारखान्यांमधील कामगार, खाद्यपदार्थ घरपोच सेवा देणारे झोमॉटेचे कर्मचारी आदींच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली होती. पेट्रोल पंपावरही चाचण्या करण्यात येत होत्या. त्यामुळे वेळीच करोनाबाधित रुग्ण सापडून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत होते. परिणामी, करोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली.