मुंबईमध्ये गुरुवारी तब्बल ९९८ जणांना करोनाची बाधा झाली असून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या तब्बल १६ हजार ५७९ वर पोहोचली आहे. तर मुंबईतील २५ करोनाबाधितांचा गुरुवारी मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६२१ वर पोहोचली आहे.  विविध रुग्णालयांमधील ४४३ जण करोनामुक्त झाले.

मुंबईत गुरुवारी ९९८ जणांना करोनाची बाधा झाली असून मुंबईतील बाधितांची संख्या १६ हजार ५७९ वर पोहोचली आहे. तसेच गुरुवारी २५ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६२१ झाली आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गुरुवारी ६४३ करोना संशयीत रुग्ण दाखल झाले असून आतापर्यंत रुग्णालयात तब्बल १७ हजार ३७७ करोना संशयीतांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल ४४३ करोना रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. ४२३४ रुग्ण करोनामुक्त  झाले आहेत.

धारावीत दोघांचा मृत्यू

धारावीमध्ये गुरुवारी ३३ जणांना करोनाची बाधा झाली तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या १०६१ वर, तर मृतांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. दादरमधील सहा रहिवाशांना गुरुवारी करोना झाला असून दादरमधील करोनाबाधितांची संख्या १३९ वर पोहोचली आहे. माहीम परिसरात आज सात जणांना करोनाची लागण झाली असून येथील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली आहे.

अन्य रुग्णांसाठी साडेसात हजार खाटा

इतर आजारांच्या रुग्णांचे करोना परिस्थितीमुळे अतोनात हाल होत असल्याची बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, खासगी नर्सिग होममध्ये अन्य रुग्णांसाठी साडेसात हजाराहून अधिक खाटा उपलब्ध केल्या आहेत. अशी रुग्णालये आणि नर्सिग होम यांची नाव, पत्ता, संपर्क क्रमांकांसह विभागनिहाय माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर आहे. अधिक माहितीसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एक हजार २७८, परळच्या केईएम रुग्णालयात एक हजार ७११, जुहू-विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्णालयात ५५० अशा एकूण तीन हजार ५३९ खाटा राखून ठेवल्या आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन हजार ७६, २७ प्रसूतिगृहांमध्ये ८९९ खाटा उपलब्ध केल्या आहेत. पालिकेचे १८७ दवाखाने आणि एक हजार ४१६ खासगी नर्सिग होममध्येही अन्य आजाराच्या रुग्णांना उपचार घेता येतील.