रुग्ण, संशयितांच्या विलगीकरणामुळे करोनावर नियंत्रण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : विलगीकरण केंद्रात जाण्यास राजी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांची प्रतिजन चाचणी करून करोनाबाधित आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्याचा सपाटा पालिकेने मालाडमध्ये लावला आहे. मालाड परिसरातील इमारतींमधील बाधितांना रुग्णालयात, तर संशयितांना विलगीकरणात रवानगी करून करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिका यशस्वी होऊ लागली आहे.

मालाड पूर्व-पश्चिम परिसरातील झोपडपट्टय़ांमधील करोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येत असतानाच इमारतींमधील रुग्णसंख्या वाढू लागली होती. त्यामुळे पालिकेच्या ‘पी-उत्तर’ विभागाने झोपडपट्टय़ांसोबतच उच्चभ्रू वस्त्यांमधील सोसायटय़ा, चाळींकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. जून महिन्यात साधारण १०० बाधित रुग्णांमध्ये ७५ झोपडपट्टीतील, तर २५ इमारतींमधील व्यक्तींचा समावेश होता. मात्र जुलैमध्ये हे चित्र बदलले आणि इमारतींमधील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे निदर्शनास आले.

ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे असलेल्या व्यक्तीला नियमानुसार एक दिवस विलगीकरणात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची करोनाची चाचणी करण्यात येते. मात्र इमारतींमधील रहिवाशी विलगीकरण केंद्रात जाण्यास राजी होत नसल्यामुळे करोना चाचण्या करण्यात अडचण येऊ लागली होती. म्हणून पालिकेच्या ‘पी-उत्तर’ विभागाने मालाड परिसरातील इमारतींमधील रहिवाशांच्या प्रतिजन चाचण्या करण्यास सुरुवात केली. घरीच चाचणी केल्यानंतर अर्ध्या तासात अहवाल हाती येऊन करोनाची बाधा झाली आहे की नाही ते स्पष्ट होऊ लागले. अहवालात करोना झाल्याचे समजताच संबंधित रुग्णाला रुग्णालयात, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची कार्यवाही मोठय़ा प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित आणि संशयित रुग्णांचा इमारतींमधील अन्य रहिवाशांशी संपर्क टळू लागला आणि आता मालाडमधील इमारतींतील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे.

त्याचबरोबर ‘पी-उत्तर’ विभागाने जुलैमध्ये भारतीय जैन संघाच्या सहकार्याने मालाड परिसरात आयोजित केलेल्या सुमारे ११० शिबिरांमध्ये १६ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरांमध्ये लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या करोना चाचण्याही करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत एक हजार ९०० व्यक्तींची प्रतिजन चाचणी करण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मालाड परिसरात दररोज करोनाची बाधा झालेले किमान १०० रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या आठवडय़ात प्रतिदिन साधारण ५८ जणांना बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणी शिबिरांचे आयोजन आणि करण्यात येत असलेल्या प्रतिजन चाचण्यांमुळे मालाडमधील रुग्ण वाढीचा दर ०.८ टक्के झाला आहे. मालाडच्या झोपडपट्टय़ांमध्ये ३५ प्रतिबंधित क्षेत्रे होती. नवे रुग्ण न सापडल्याने त्यापैकी सात क्षेत्रे प्रतिबंधांतून मुक्त करण्यात आली आहेत. तर रुग्ण सापडल्यामुळे ३४६ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या आहेत.

सर्वात कमी रुग्णसंख्या

मुंबईतील इतर भागांच्या तुलनते पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मरिन लाइन्स, चिराबाजार, भुलेश्वर आणि आसपास, तसेच ‘बी’ विभागाच्या हद्दीतील  सॅण्डहर्ट रोड, डोंगरी, भेंडीबाजार आणि आसपासच्या परिसरात तुलनेत कमी रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ‘सी’ व ‘बी’ विभागात अनुक्रमे १५५४ आणि १०३० जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले.

तपासणी शिबीर आणि करण्यात येणाऱ्या प्रतिजन चाचण्यांमुळे रुग्णांचा शोध झटपट लागत असून बाधित रुग्ण सापडल्यानंतर पुढील प्रक्रिया तातडीने करण्यात येत आहे. त्यामुळे इमारतींमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येवू लागली आहे.

– संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त, ‘पी-उत्तर’

मालाड

६७९८ एकूण रुग्णसंख्या

९४९ सक्रिय रुग्ण