निशांत सरवणकर

सेवाकराराच्या नावाखाली महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे म्हाडाच्या विविध मंडळात गेल्या काही वर्षांपासून रिक्त पदे असून ती भरण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सेवानिवृत्तांची भरती करून तात्पुरती वेळ मारून नेली आहे. पावसाळापूर्व तयारीसाठी इमारत व दुरुस्ती मंडळात तूर्तास २३ सेवानिवृत्तांची वर्णी लावण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाचा हवाला देत ही खोगीर भरती करण्यात आली असली तरी महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या म्हाडात मुंबई गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार मंडळातील नियुक्तीला विशेष महत्त्व आहे. इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात हे अधिकारी नियुक्तीसाठी इच्छुक नसतात. त्यामुळे या मंडळातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असतात. एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन कार्यभार असतात. गेली काही वर्षे हे प्रकार सुरू आहे. मुंबई मंडळ व झोपडपट्टी सुधार मंडळात काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात बदल्या करण्याची जबाबदारी म्हाडाने पार पाडली नाही वा रिक्त पदे भरण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे या मंडळात अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी सेनानिवृत्तांची खोगीर भरती करण्यात आली. या प्रत्येक अधिकाऱ्याला पदे बहाल करण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नगररचना व मुख्य नियोजनकार विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक नरेशचंद्र कावळे यांना नियुक्ती देताना सल्लागार नेमण्यात आले आहे. त्याच वेळी या २३ सेवानिवृत्तांना पदे बहाल करण्यात आली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची कायमस्वरूपी पदावर नियुक्ती करता येत नाही. सल्लागार म्हणून त्यांना किमान एक ते कमाल तीन वर्षांपर्यंत नियुक्त करता येते.

सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजय गौतम यांची जलसंपदा विभागात थेट पदावर नियुक्ती करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यास प्रचंड विरोध झाला. म्हाडात तर या २३ सेवानिवृत्तांची थेट पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पाच सेवानिवृत्तांना कार्यकारी अभियंता तर उर्वरितांना उपअभियंता ही महत्त्वाची पदे बहाल करण्यात आली आहेत. याबाबत म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांना विचारले असता, त्यांनी या सेवानिवृत्तांना सहीचे अधिकार नाहीत व ते अन्य अधिकाऱ्यांना मदत करतील, असे म्हटले आहे. परंतु कार्यकारी अभियंता वा उपअभियंता अशी पदे बहाल केल्यानंतर हे संबंधित सेवानिवृत्त कोणाच्या हाताखाली काम करतील, असे वाटत नसल्याकडे म्हाडातील विद्यमान अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

सेवानिवृत्तांना नियुक्ती दिली असली तरी ती तात्पुरती आहे. त्यांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाहीत. भरती प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर या सेवानिवृत्तांची सेवा समाप्त केली जाईल.

– राजकुमार सागर, सचिव, म्हाडा