कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संभाजी भिडेंविरोधात अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्चपर्यंत आम्ही मुदत देतो आहोत. कायदा सगळ्यांना सारखा आहे. मिलिंद एकबोटेंना अटक झाली आता संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक झाली नाही तर मुंबईत धडकणार आहोत आणि जोपर्यंत संभाजी भिडेंना अटक केली जात नाही तोपर्यंत मुंबईचा ताबा सोडणार नाही असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करून येताना दलित बांधवांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले त्यानंतर भारीप बहुजन महासंघाने मुंबई बंदचीही हाक दिली होती. तसेच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी या दोघांना अटक का होत नाही असा प्रश्न वारंवार आंबेडकरी संघटना आणि विरोधकांकडून विचारण्यात आला. अखेर मिलिंद एकबोटेंना या प्रकरणी अटक झाली. त्यानंतर संभाजी भिडेंनाही अटक करण्यात यावी अशी मागणी होते आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आता २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर २६ मार्चलाच मुंबईवर मोर्चा काढू आणि मुंबई भिडे यांच्या अटकेपर्यंत ताब्यात घेऊ असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यात सरकारचे कोणतेही श्रेय नाही. पण आता एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र चर्चा नाहीच हा स्थगन प्रस्तावच सभापतींनी फेटाळून लावला.