News Flash

एटीएमबाबत जाणू सर्वकाही..

नव्या नोटांचे केवळ रूपच बदलले नाही तर त्यांचा आकारही बदलला.

प्रातिनिधीक छायाचित्र

जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांप्रमाणेच एटीएमही सर्वाधिक चर्चेत आले. चलनात असलेल्या सध्याच्या नोटा माघारी घेण्याकरिता बँका एक दिवस बंद होत्या, तर एटीएम अजूनही सुरळीत झालेले नाहीत. नव्या नोटांचे केवळ रूपच बदलले नाही तर त्यांचा आकारही बदलला. त्यासाठी एटीएममध्येही अंतर्गत असे तांत्रिक बदलही करावे लागले. यामागील बाजू पुढील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समोर आणण्याचा हा प्रयत्न-

एटीएम म्हणजे काय?

अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन (एनी टाइम मनी नव्हे). अ‍ॅटोमॅटिक बँकिंग मशीन (एबीएम) म्हणूनही तिला संबोधले जाते.

एटीएम कशासाठी?

मानवी हस्तक्षेपाशिवाय इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनच्या साहाय्याने वित्तीय व्यवहार करणारी एटीएम ही यंत्रणा आहे. पैशाशी निगडित आपण जे व्यवहार बँकांच्या शाखांमध्ये करतो ते जवळपास सारे व्यवहार एटीएमवर खातेदाराला या मशीनच्या साहाय्याने करता येतात. यामध्ये पैसे काढणे, जमा करणे तसेच पैसे हस्तांतरित, देयक रक्कम (पेमेंट), खात्यातील शिल्लक रक्कम आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त गुंतवणूक/बचतीच्या विविध वित्तीय सेवाही आता एटीएमद्वारे करता येतात.

कार्डचे व्यवहार करण्यासाठी शुल्क लागते काय?

संबंधित बँकेचे कार्ड तुम्ही त्या बँकेच्या एटीएमवर वापरू शकता. मात्र इतर बँकांच्या एटीएमकरिता ते वापरावयाचे झाल्यास असे महिन्यातील पहिले पाच व्यवहार विनाशुल्क होतात. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहाराकरिता २० रुपये शुल्क लागते. मुंबईसारख्या सहा महानगरांमध्ये (बचत खातेधारकाला)असे तीन व्यवहार मोफत आहेत. सध्याच्या निश्चलनीकरण प्रक्रियेत ते ३० डिसेंबपर्यंत माफ करण्यात आले आहे.

एटीएममध्ये रोकड कुठे असते?

 • प्रत्येक मूल्याच्या चलनासाठी एटीएममध्ये स्वतंत्र रकाने असतात. त्याला कॅसेट म्हटले जाते. प्रत्येक एटीएममध्ये चार कॅसेट असतात. आतापर्यंत या चार कॅसेटपैकी दोन कॅसेटमध्ये पाचशे रुपयांच्या व उरलेल्या दोन कॅसेटमध्ये अनुक्रमे १०० व १ हजार रुपयांच्या नोटा ठेवल्या जात होत्या. आता त्यात बदल करण्यात आला आहे.
 • चलनाचा आकार, त्याची जाडी यानुसार या रकान्यांची रचना तयार केलेली असते. रकान्याला असलेल्या सांकेतिक क्रमांकानुसार चलन त्यात ठेवावे लागते. हे रकाने एटीएमवरील स्क्रीनमागे असलेल्या यंत्रणेवर कार्यरत होतात. यात बदल करणारी यंत्रणा मशीन तयार करणाऱ्या कंपन्या व त्यांना माहिती तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपन्यांना विकसित करावी लागते.
 • सध्याच्या निश्चलनीकरण प्रक्रियेत हे रकाने बदलणे आवश्यक ठरले असून उपलब्ध नव्या चलनाच्या आकार, जाडीनुसार त्यात बदल करण्यात येत आहेत. या प्रक्रियेला ‘रीकॅलिब्रेशन’ असे म्हटले जाते.
 • एका एटीएममध्ये ‘रीकॅलिब्रेशन’ करण्यासाठी चार तास ते अर्धा दिवस लागतो. हे काम करणारा एक अभियंता दिवसाला दोन ते तीन एटीएम ‘रीकॅलिब्रेट’ करू शकतो. देशात दोन लाखांपेक्षा जास्त एटीएम असल्याने दहा हजार अभियंत्यांना ही सगळी यंत्रे ‘रीकॅलिब्रेट’ करण्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

एटीएम कसे काम करते?

 • ‘एटीएम’च्या ‘कार्ड स्लॉट’मध्ये वापरकर्ता डेबिट वा क्रेडिट कार्ड स्वाइप करतो. काही ठिकाणी कार्ड मशीनमध्ये दाखल करून घेतले जाते.
 • यंत्राने कार्डवरील सांकेतिक तपशील नोंदवल्यानंतर संबंधित खातेदाराचे नाव यंत्राच्या स्क्रीनवर झळकते. स्क्रीनच्या आजूबाजूला असलेल्या बटणांच्या साह्याने वापरकर्ता कार्डाचा पिन नोंदवतो.
 • ही नोंदणी झाल्यानंतर यंत्र कार्ड व पिन तंतोतंत जुळत आहेत का, याची खातरजमा करते. ही पडताळणी बँकेच्या मुख्य सव्‍‌र्हरमधील माहितीशी केली जाते. ती योग्य असल्यास वापरकर्ता पैसे काढू शकतो वा अन्य संबंधित बाबी पूर्ण करू शकतो.
 • वापरकर्ता जेव्हा एखाद्या व्यवहारासाठी नोंदी करतो, तेव्हा ती माहिती ‘स्विच’ नावाच्या यंत्रणेकडे पाठवली जाते. ही माहिती ज्या बँकेचे कार्ड आहे, त्या बँकेकडे पाठवली जाते.
 • बँकेच्या सव्‍‌र्हरमधून सर्व नोंदींची खातरजमा झाल्यानंतर ‘स्विच’कडून एटीएम यंत्राला ‘हिरवा कंदील’ दाखवला जातो. त्यानंतर त्यातून नोंदवलेली रोकड बाहेर पडते.
 • कार्डशी संबंधित बँक खात्यात रक्कम नसेल, यंत्रात रोकड अनुपलब्ध वा अपुरी असेल किंवा ठरावीक चलनात ती उपलब्ध नसेल तर स्क्रीनवर त्या त्या बाबींशी संबंधित सूचना दर्शवली जाते.
 • ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदांपासून दोन मिनिटे इतक्या कमी वेळेत पार पडते.

पैसे भरण्याची प्रक्रिया

एटीएममधील पायाभूत सुविधा, यंत्र हाताळणी, देखभाल आणि त्यात पैसे भरणे या सगळय़ा प्रक्रिया वेगवेगळय़ा सेवापुरवठादार कंपन्यांकडून केल्या जातात. पैशांचा भरणा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. ते बँकेने दिलेल्या सूचनेनुसार पैशांची एटीएमपर्यंतची वाहतूक करतात. सध्या निर्माण झालेली परिस्थिती वगळता, सामान्य दिवशी पैसे भरणाऱ्या कंपन्या बँकेच्या मुख्य शाखेतून अथवा कार्यालयातून सकाळी दहा वाजता रोकड घेतात. ज्या एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते त्या एटीएमचा ‘पासवर्ड’ त्यांच्याकडे सोपवला जातो. रोकड जमा करणाऱ्या पथकात एटीएम तंत्रज्ञान अभियंते तसेच सुरक्षारक्षक यांचा समावेश असतो. हे पथक कोणत्याही एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी जाताना दर वेळी वेगवेगळय़ा रस्त्याचा अवलंब करते. त्यांची वाहनेही तंत्रसज्ज असतात. या वाहनांमध्ये ‘जीपीएस ट्रॅकर’ बसवलेले असतात. जर वाहन ठरवून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळय़ा रस्त्याने जात असेल तर त्याची त्वरित सूचना कंपनीच्या कक्षात जाते तसेच गाडीच्या मागच्या भागात बसलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही त्याची सूचना दिली जाते. अशा प्रसंगी कंपनीच्या सुरक्षा कक्षामध्ये गाडी जागीच थांबवण्याची सुविधा असते. एटीएमजवळ वाहन पोहोचल्यापासून त्यात रोकड भरेपर्यंत जवळपास २०-३० मिनिटांचा अवधी लागतो. एटीएममध्ये रोकड भरण्याची नियमित मुदत नसते. ज्या वेळी त्यातील रोकड संपते त्या वेळी रोकड भरण्याची जबाबदारी असलेली कंपनी तेथे जाऊन रोकडचा पुरवठा करते. दुर्गम भागात किंवा लांब अंतरावर असलेल्या एटीएममध्ये जलद रोकड पुरवठा व्हावा, यासाठी बँक आधीच कंपनीकडे नोटांचा साठा सोपवते. त्यामुळे अशा ठिकाणच्या एटीएममधील रोकड संपल्यास कंपनी बँकेतून रोकड न आणता आपल्या साठय़ात असलेली रोकड थेट एटीएम केंद्रात जाऊन जमा करते.

,०१,८७१

भारतातील एटीएमची संख्या सर्वाधिक एटीएम भारतीय स्टेट बँक

४०,०००

अभियंते एटीएमशी संबंधित तंत्रज्ञान हाताळण्यासाठी  कार्यरत आहेत.

१२,००,०००

रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकांना एटीएममध्ये ठेवता येत नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 2:05 am

Web Title: article on atm process
Next Stories
1 नोटा खपवणाऱ्या फुकटय़ांवर नजर!
2 नोटा मोजणारी यंत्रेही थकली!
3 आधी कौतुक, नंतर टीका
Just Now!
X