‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, हा घ्या पुरावा’ असं ट्विट करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाचे नेते अशिष शेलार यांनी ट्विटवरुन उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने मांत्रिक म्हणून ज्या व्यक्तीचा शेलारांबरोबरचा फोटो ट्विट केला आहे तो फोटो त्यांच्याच इमारतीमधील एका फॅशन डिझायनरचा असल्याचे त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. इतकच नाही तर आपण मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनाच “भोंदूबाबा” म्हणावे का? असा प्रश्न आपल्याला पडल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते अशिष शेलार यांच्यावर केली होती. ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत,’ असं यावेळी आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेलार यांचा मांत्रिकाच्या वेशातील एका व्यक्तीबरोबरचा फोटो ट्विट करण्यात आला. या फोटोमध्ये शेलार यांच्याबरोबर उभ्या असणारी व्यक्तीने काळे कपडे परिधान केलेले आहेत. या व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचे दिसत आहे. हा फोटो म्हणजे आव्हाडांनी केलेल्या दाव्याचा पुरावा आहे असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

याच ट्विटला आता आशिष शेलार यांनी ट्विटवरुन उत्तर दिलं आहे. शेलार यांचा जो फोटो राष्ट्रवादीने ट्विट केला होता त्या फोटोमध्ये असणाऱ्या व्यक्तीने म्हणजेच फिरोज शकीर यांनी यासंदर्भात स्पष्टीकरणाचे ट्विट केले. हेच ट्विट शेलार यांनी कोट करुन रिट्वीट केलं आहे. “माझ्या इमारतीमधे राहणाऱ्या एका फँशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना “भोंदूबाबा” म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हास्यास्पदच आहे हे सारे,” असं शेलार म्हणाले आहेत.

तर फिरोज शकीर यांनी शेलार यांच्याबरोबरचे काही फोटो ट्विट करत आपण शेलार यांच्याच इमारतीमध्ये राहतो असं सांगितलं आहे. “मी बॉलिवूडमध्ये काम करणारा फॅशन डिझायनर आहे. मागील 40 वर्षांपासून मी काम करत असून मी शेलार यांच्याच इमारतीमध्ये राहतो. मी तांत्रिक नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. मी एक मुस्लीम फोटोग्राफरने हिंदूत्व, बौद्ध, सुफी, ख्रिश्चन, शीख असा सर्वच धर्मांचे संदर्भ देत जागतिक शांतीचा संदेश देण्यासाठी एक फोटोशूट केले होते तेव्हाचे हे फोटो आहेत,” असं स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की काय म्हणाले होते आव्हाड

काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शेलार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी, “आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असेल. अमूक एक अदृष्य शक्ती आहे वगैरे सांगितलं असेल. पण असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या शक्ती आमच्या जवळ आहेत. आमच्या अंतर्मनातून आलेल्या शक्ती या प्रचंड एकनिष्ठ, बलवान आणि स्वत:च्या विचारबरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत,” असं मत व्यक्त केलं होतं.