खासगी क्षेत्रातील आघाडीच्या पाच बँकांपैकी एक असलेली अ‌ॅक्सिस बँक लवकरच आपला एक मोठा ग्राहक गमावण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्ता पालटाचा फटका अ‌ॅक्सिस बँकेला बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अ‌ॅक्सिस बँकेतील पोलीस विभागाची खाती राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवायची आहेत.

महिना अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबई मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे. राज्याच्या पोलीस खात्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वार्षिक वेतनाचा खर्च ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आधी पोलीस विभागाची सर्व खाती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होती. पोलिसांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून वितरीत करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरुन अ‌ॅक्सिस बँकेत पोलिसांची खाती ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप नागपूर स्थित सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी केला होता. त्यांनी ऑगस्ट महिन्यात ईडीकडे याबद्दल तक्रारही केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‌ॅक्सिस बँकच्या पश्चिम भारताच्या व्हाईस प्रेसिडंट आणि कॉर्पोरेट हेड आहेत.

या निर्णयामुळे अ‌ॅक्सिस बँकेला फायदा झाला पण स्टेट बँकेचे नुकसान झाले असा दावा जबलपुरे यांनी केला होता. अमृता फडणवीस यांच्याबरोबर लग्न होण्याच्या आठ महिनेआधी मार्च २००५ मध्ये अ‌ॅक्सिस बँकेत पोलिसांची खाती सुरु करण्यात आली होती. अ‌ॅक्सिस किंवा अन्य कुठल्याही बँकेमध्ये सरकारी खाती असली तरी त्या बँकांची निवड आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली आहे असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते.