वर्षांनुर्वष आर्थिक तोटय़ात धावणाऱ्या परिवहन सेवेला गती देण्यासाठी ‘बेस्ट’ने नव्या ३०३ बसगाडय़ांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीने गुरुवारी मंजूर केला. त्यानुसार पुढील मार्च महिन्यात २०१७ पर्यंत बसच्या ताफ्यात नव्या बसगाडय़ा दाखल होणार आहे. महापालिकेने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही खरेदी केली जाणार आहे.महापालिकेने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही खरेदी केली जाणार आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यातील तब्बल ३०० बसगाडय़ांचे आयुर्मान संपल्याने त्या लवकरच भंगारात काढण्यात येणार आहेत. याच धर्तीवर पालिकेने १०० कोटींची तरतूद केली होती. मात्र बेस्ट प्रशासनाच्या ढीम्म कारभारामुळे नव्या बसगाडय़ा खरेदीसाठी गती येत नव्हती. आता मात्र बेस्ट समितीच्या बैठकीत नव्या बसगाडय़ा खरेदीसाठीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने नव्या गाडय़ांचा ‘मार्ग’ मोकळा झाला आहे.

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या गाडय़ा १२ महिन्यांत येणार असल्याची लेखी हमी ‘टाटा मोटार लिमिटेड’ बस कंपनीने दिली आहे, असे ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. तर नव्या बसगाडय़ांत प्रवाशांसाठी आसनाजवळ मोबाइल चार्जिग पॉइंट बसवण्यासह नव्या बसगाडय़ांवर आकारण्यात येणारे विविध कर माफ करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली.

‘बेस्ट’चे फेसबुक सुरू

समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ‘बेस्ट’ प्रशासानाने अधिकृत फेसबुक पेज सुरू केले आहे. या माध्यमातून प्रशासन बेस्ट प्रवाशांच्या आणि वीज ग्राहकांच्या तक्रारींसह सूचना जाणून घेणार आहे.  याशिवाय बेस्टचा इतिहास, जुन्या गाडय़ांच्या माहितीसह छायाचित्र, बेस्टचे प्रसिद्धीपत्रक, नवीन बस मार्ग, महत्त्वाच्या घोषणा आणि वीज ग्राहकांसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. बस प्रवाशांसाठी १८००२२७५५० तर वीज ग्राहकांसाठी २२८४३९३९ हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवीन बसगाडीची वैशिष्टय़े

  • ४५ आसन क्षमता असेल.
  • दोन आसनांमधील अंतर अधिक असेल.
  • डिजिटल डिस्प्ले असतील.
  • वायुविजनची व्यवस्था (हवा खेळती राहण्यासाठी यंत्र)
  • जीपीएस यंत्रणा आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
  • १२ मीटरची बस आणि टय़ूबलेस टायर असणार आहेत.