राज्यात ७ लाख ३९ हजार विना हेल्मेट प्रकरणे *गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० महिन्यांत कारवाई दुप्पट

 *मुंबई, पुणे शहरात दुचाकीस्वारांकडून नियम धाब्यावरच

राज्यात दुचाकीचालकांकडून वाढते अपघात पाहता हेल्मेटसक्ती केल्यानंतरही त्याकडे चालक कानाडोळाच करत आहेत. राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दहा महिन्यातच वाहतुक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ३९ हजार विना हेल्मेट प्रकरणांची नोंद झाली आहे. वाढलेल्या कारवाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विना हेल्मेट प्रकरणांची नोंद दुप्पट झाली. मुंबई, पुणे शहरातील दुचाकीचालकांनी तर नियम धाब्यावरच बसविले आहेत. सर्वाधिक कारवाई झाली आहे.

हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांत जिवितहानी मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्तीची भूमिका सातत्याने घेण्यात आली. त्याला पुणेसह आणखी काही भागांतून विरोध झाला. ही सक्ती करण्यासाठी पेट्रेाल पंपावर पेट्रोल न देण्याचीही भूमिका घेण्यात आली. तरीही या सक्तीना चालकांनी जुमानले नाही. अखेर वाहतुक पोलिसांनी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद शहरासह राज्यातील सर्वच शहरांत कारवाईची धार अधिक तीव्र केली. यासाठी सीसीटीव्हींद्वारे ई-चलान कारवाईचाही आधार पोलिसांनी घेतला.

सीसीटीव्हींमार्फत कारवाई करताना त्यात मोठी वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ मध्ये राज्यात ३ लाख ५७ हजार ६७८ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत वाढ झाली. तब्बल ७ लाख ३९ हजार ३०३ प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी १२ कोटी ३४ लाख ८० हजार रुपये दंड वसुल केला असतानाच तो यंदा १६ कोटी ७ लाखांपर्यंत पोहोचला आहे.

हेल्मेट सक्तीकडे मुंबई, पुणेकरांनी दुर्लक्षच केले आहे. १ लाख २१ हजार १२९ प्रकरणे दाखल असतानाच त्यात वाढ होऊन २०१९ मध्ये २ लाख ९९ हजार ३८५ प्रकरणे दाखल झाल्याचे सांगितले. नोव्हेंबर महिन्यात यात आणखी वाढ झाली असेल. पुणेकरांनीही हेल्मेट घालण्यास नापंसतीच दर्शवली असल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये ८० हजार ३३ प्रकरणे असतानाच १ लाख ७५ हजार ६७५ प्रकरणे झाली आहेत. मुंबईमध्ये या कारवाईमध्ये आणखी वाढ करण्यासाठी नवीन यंत्रणा अंमलात आणण्याचा विचार केला जात आहे. बसवलेल्या सीसीटींव्हींमध्ये ६० स्पीड कॅमेरे असून या कॅमेऱ्यांमध्ये विना हेल्मेट दुचाकीचालक दिसला कि त्याचेही ई-चलान करण्याची यंत्रणा आणण्याचा विचार पोलीस करत आहेत.