|| संदीप आचार्य

आरोग्य विभागाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा खूपच कमी राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण हे ८० टक्क्यांच्या आसपास आहे तर पुरुष नसंबंदीचे प्रमाण हे अवघे तीन टक्के एवढेच आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातही कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत स्त्री व पुरुषांच्या शस्त्रक्रिया तसेच संततीनियमनाच्या अन्य साधनांचे वाटप केले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांना नसबंदी केल्यास ११०० रुपये तर स्त्रियांना ६०० रुपये दिले जातात. शस्त्रक्रियेसाठी उद्युक्त करण्याऱ्या प्रवर्तकांना अनुक्रमे २०० रुपये व १५० रुपये दिले जातात. यासाठी आरोग्य विभागाकडून कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रचार व प्रसार केला जात. आशा कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कुटुंब नियोजनासाठी घरोघरी जनजागृती केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत स्त्रियांप्रमाणेच पुरुषांकडून नसबंदीच्या करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण  घसरत चालले आहे. २०१५-१६ मध्ये १३,९६८ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली तर २०१७-१८ मध्ये ११,५७७ लोकांनी ही शस्त्रक्रिया केली. २०१८-१९ मध्ये मे अखेरीस केवळ ४६९ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली असून त्या तुलनेत निरोधच्या वापराला पुरुषांनी मोठय़ा प्रमाणात प्राधान्य दिल्याचे आढळून येते. २०१५-१६ मध्ये आरोग्य विभागाने ६१ लाख ७४ हजार निरोधचे वाटप केले होते तर २०१६-१७ साली हेच प्रमाण दुप्पट होऊन आरोग्य विभागाने तब्बल एक कोटी ३३ लाख निरोधचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये तब्बल एक कोटी ५६ लाख निरोध वाटण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

सामान्यपणे महिलांकडून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या जाण्याचे प्रमाण हे जास्तच राहिले आहे. तथापि गेल्या काही वर्षांत गर्भनिरोधाच्या अन्य साधनांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. इंजेक्शन तसेच निरोधचा वापर करण्याला प्राधान्य देण्यात येत असून आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या व्यापक जनजागृतीमुळेच संतती नियमनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होत आहे     – डॉ. सतीश पवार, सहसंचालक आरोग्य