पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी नाव न घेता, मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे.

“आज देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्या…” अशी टीका अतुल भातखळकर  यांनी नाव न घेता केली.

भातखळकर म्हणाले, “आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करून तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आदी राज्य सरकारांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली. आजच्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लस योजनेची घोषणा केली.”

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं २५ टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. योगायोग असा की, दोन आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन ही आहे. २१ जूनपासून देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात १८ वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील,” अशी घोषणा मोदी यांनी केली.

हेह वाचा- दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

‘सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला’

“जगात लसीची मागणी होत आहे. लशींच्या मागणीशी तुलना केली, तर जगात करोना लसीचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. मग अशा परिस्थिती जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे, त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.