News Flash

आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

प्रविण दरेकर आणि अमोल मिटकरींमध्ये राजकीय कलगीतुरा!

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असताना त्यावर राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक सुरू होताच भाजपाकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. “भाजपाकडे बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले होते. त्यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी?” असा प्रश्न प्रविण दरेकरांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.

थकणं भाजपाच्या रक्तातच नाही!

प्रविण दरेकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करून अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! महाविकासआघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

 

भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरूनच प्रविण दरेकर आणि भाजपाला खोचक टोमणा मारला होता. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर महाराष्ट्र महाविकासआघाडी सरकारवर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे. भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यावर प्रविण दरेकरांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता हा राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत.

 

काय झालं मुख्यमंत्र्यांच्या भेटीत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी आरक्षणावरची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, मेट्रो कारशेडचा मुद्दा, जीएसटी परतावा, पीक विमान, चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी, मराठी भाषेला अभिजात दर्जा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तसेच, यावेळी राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या १२ विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्यांच्या मुद्द्यावर देखील पंतप्रधानांकडे विनंती केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

 

“मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो”; उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत संतापले

मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर!

दरम्यान, या भेटीतील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे प्रिमॅच्युअर अर्थात वेळेआधीचं असल्याचं म्हटलंय. “मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे. भोसले समितीने मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल, तर राज्यानं राज्य मागासवर्ग आयोगाची स्थानपना करून त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी असं सांगितलं आहे. पण ती कारवाई करण्यात आलेली नाही. पण तरीदेखील भेटले ते चांगलंच आहे. पुढे त्याचा फायदाच होईल”, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:21 pm

Web Title: bjp pravin darekar on ncp amol mitkari tweet on cm uddhav thackeray meet pm narendra modi pmw 88
Next Stories
1 “आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं”, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया!
2 करोनाशी लढणाऱ्या मुंबईकराच्या जीवाशी सुरू होता खेळ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3 उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना टोला
Just Now!
X