News Flash

आरेखक, अनुरेखकांचेही मलईदार विभागात बस्तान

पालिकेच्या नियमानुसार एका विभागात तीन वर्षे काम केल्यानंतर अधिकारी- कर्मचाऱ्याची बदली करण्यात येते.

आरेखक, अनुरेखकांचेही मलईदार विभागात बस्तान
(संग्रहित छायाचित्र)

नागरी कामे, प्रकल्प, पालिकेशी संबंधित बांधकामे आदींसाठी नकाशा आखणारे आरेखक (ड्राफ्टमन) आणि तो पारदर्शक कागदावर उतरविण्याचे काम करणारे अनुरेखक (ट्रेसर) यांनी अभियंत्यांप्रमाणेच पालिकेच्या मलईदार विभागांमध्ये ठाण मांडले आहे. राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष मर्जी असलेले काही आरेखक आणि अनुरेखक गेली १५ ते २० वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. तर काही जण एक-दोन दिवसांपुरती बदली करून पुन्हा पूर्वीच्या विभागात विराजमान झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या देऊन बसलेल्या आरेखक आणि अनुरेखकांबद्दल प्रशासनही मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहे.

पालिकेच्या नियमानुसार एका विभागात तीन वर्षे काम केल्यानंतर अधिकारी- कर्मचाऱ्याची बदली करण्यात येते. मात्र असे असतानाही ७८७ अभियंत्यांप्रमाणेच पालिकेचे आरेखक आणि अनुरेखक वर्षांनुवर्षे मलईदार विभागांमध्ये ठाण मांडून बसल्याची बाब उघडकीस आली आहे.

पालिकेची नागरी कामे, प्रकल्प आणि अन्य छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी नकाशा तयार करणे आणि तो पारदर्शक कागदावर उतरविण्याच्या कामाची जबाबदारी अनुक्रमे आरेखक आणि अनुरेखकांवर सोपविण्यात येते. एके काळी पालिकादरबारी आरेखक आणि अनुरेखकांची मोठी फौज कार्यरत होती. मात्र पालिकेच्या कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू आरेखक आणि अनुरेखकांवरील कामाचा भार हलका झाला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे हळूहळू नकाशे तयार करण्याचे काम कमी होऊ लागले. पालिकेनेही आरेखक आणि अनुरेखकपदावरील व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर पदे भरली नाहीत. त्यामुळे आजघडीला पालिकेत ३८ आरेखक आणि २८ अनुलेखक असे एकूण ६६ जण नकाशा तयार करणे आणि तो पारदर्शक कागदावर उतरविण्याचे काम करीत आहेत.

अभियंत्यांप्रमाणेच आरेखक आणि अनुरेखक वर्षांनुवर्षे एकाच विभागात काम करीत आहेत, तर काही जण हव्या असलेल्या विभागांमध्ये बदली करून घेत असल्याची बाब माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश सावंत यांनी पालिकेकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीतून उघड झाली आहे. काही आरेखक आणि अनुरेखक अनेक वर्षे एकाच विभागात काम करीत असल्याची बाब सावंत यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून निदर्शनास आणून दिली आहे. मात्र आजही हे आरेखक व अनुरेखक मलईदार विभागांमध्ये ठाण मांडून आहेत.

एक दिवसाची ‘बदली’

निम्म्याहून अधिक आरेखक आणि अनुरेखकांनी राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करून हव्या असलेल्या विभागांमध्ये नियुक्ती करून घेतली आहे. काहींनी तर तांत्रिकदृष्टय़ा एक दिवसाची बदली करून घेऊन पुन्हा जुन्या विभागात बस्तान ठोकले आहे. आरेखक आणि अनुरेखकांसाठी पालिकेतील विकास नियोजन, इमारत प्रस्ताव, नगररचना, वाहूतक, मलनि:सारण प्रकल्प (विशेष) हे मलईदार विभाग ठरले असून बहुतांश अरेखक आणि अनुरेखक गेली अनेक वर्षे या विभागांमध्ये ठाण मांडून आहेत. तर नको असलेल्या आरेखक आणि अनुरेखकांची जल अभियंता, इमारत परिरक्षण, पाणीपुरवठा प्रकल्प, मल प्रकल्प, उद्यान, मालमत्ता, यांत्रिकी विभागांत रवानगी करण्यात आली आहे. वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यात अपयशी ठरलेले अनेक आरेखक आणि अनुरेखकांची या विभागांमध्ये अधूनमधून बदली करण्यात येते. मात्र तीही मलईदार विभाग सोडून अन्य विभागांमध्ये  नकोसे झालेले आरेखक आणि अनुरेखक कमालीचे अस्वस्थ आहेत.

पालिकेचे नियम पायदळी तुडवून मर्जीतील आरेखक व अनुरेखकांना वर्षांनुवर्षे मलईदार विभागांमध्ये नियुक्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी.

– रमेश सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 1:11 am

Web Title: bmc draftsman and tracer in same department from 15 to 20 years
Next Stories
1 शहरबात : कोणाचे किती चुकले?
2 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण- ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड
3 मुख्यमंत्रीसाहेब एकेकाचा काटा काढत आहेत: अजित पवार
Just Now!
X