‘लेप्टोस्पायरोसिस’चा धोका टाळण्यासाठी पालिकेची प्रथमच मोहीम

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

पावसाळ्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेने प्रथमच मोठय़ा प्रमाणावर मूषक हटाव मोहीम हाती घेतली असून गेल्या चार महिन्यांत सुमारे दीड लाख मूषकांचा संहार करण्यात आला. गेल्या वर्षी पावसाळ्यात जलमय झालेली ठिकाणे या मोहिमेच्या रडारवर आहेत.

मुंबईमधील वस्त्यांमधील उकिरडे, चाळीच्या आसपासच्या परिसरांत टाकण्यात येणारा कचरा, कचऱ्याने भरलेल्या घरगल्ल्या आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणांवर मूषकांचा सुळसुळाट झाला आहे.  घरगल्ल्यांमध्ये बिळे पाडून मूषकांनी इमारतीचा पाया पोखरल्याचे प्रकारही घडले आहेत. मूषकांमुळे पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कीटकनाशक विभागाने यंदा जानेवारीपासूनच मोठय़ा प्रमाणावर मूषक नाश मोहीम हाती घेतली आहे.

सखल भागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये मूषक मरून पडतात. तसेच त्यांच्या मलमूत्र साचलेल्या पाण्यात पसरून लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. अशा पाण्यात फिरणाऱ्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिसची बाधा होऊ शकते. ही मोहीम संपूर्ण मुंबईत राबविण्यात येत आहे. मात्र गेल्या वर्षी पावसाळ्यात जलमय झालेले भाग मूषकमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईत ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल एक लाख ४५ हजार ६२६ मूषकांचा संहार करण्यात आला आहे, अशी माहिती कीटकनाशक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मूषक संहारासाठी..

’ मूषकांचा संहार करण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये विष मिसळून बनविलेल्या गोळ्यांचा वापर करण्यात येतो.

’ मूषकांच्या बिळात सेल्फॉस गोळय़ा टाकण्यात येतात. या गोळय़ा टाकताच त्यातून एक विशिष्ट वायू बाहेर पडतो. या वायूमुळे गुदमरून मूषकाचा मृत्यू होतो.

’ घरांतील मूषकांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून रहिवाशांना पिंजरेही देण्यात येत आहेत.

’ मृत मूषकांना मासळी बाजारातील कचऱ्यांच्या गाडय़ांतून देवनार कचराभूमी येथे नेऊन त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते.