संदीप आचार्य

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या धडाकेबाज करोना नियंत्रण कार्यक्रमाची दखल नागपूर व मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेला करोना जम्बो केंद्र उभारणीसह अत्यावश्यक बाबींसाठी ५० कोटी रुपयांचा निधी सीएसआर निधीतून मिळाला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो हे तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन ५०० खाटांचे लहान मुलांचे स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरु करण्यात येणार असून याशिवाय ६००० खाटांची तीन स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे पालिकेच्या तब्बल २० हजार खाटांच्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजन निर्मितीही पालिका स्वतःच करणार असून यापुढे राज्य सरकार व केंद्र सरकारवर ऑक्सिजनसाठी अवलंबून राहावे लागणार नाही, असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.

राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स!

करोनाच्या पहिल्या लाटेत ५० वयापुढील लोकांना जास्त त्रास झाला तर दुसऱ्या लाटेचा फटका तरुण वर्गाला बसला असून मोठ्या प्रमाणात तरुणांचे करोनामुळे मृत्यू झाले. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त त्रासदायक ठरेल असे तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे असून या पार्श्वभूमीवर आज दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर बैठक झाली. यात लहान मुलांसाठी करोना उपचार मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे लहान मुलांसाठी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

मुंबईतील खाटांची संख्या लवकरच ३० हजार!

एक वर्ष ते १८ वयोगटातील मुलांना या केंद्रात दाखल केले जाणार असून लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या केंद्रात ७० टक्के खाटा या ऑक्सिजन खाटा असतील तर २०० अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत असे आयुक्तांनी सांगितले. “हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र ३१ मे पूर्वी उभे करण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय २००० खाटांची आखणी तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्याचे काम सुरु झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. आताची चारही जम्बो कोविड रुग्णालये उभारताना त्याचा आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिकच्या खाटा उभारता येणार आहेत”, असे आयुक्त चहल यांनी सांगितले. मे अखेर व जून च्या मध्यावधीपर्यंत ६,५०० अतिरिक्त खाटांची जम्बो कोविड रुग्णालये उभी राहतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. सध्या पालिकेच्या डॅशबोर्ड वर २२,००० खाटा दिसत असून लवकरच ही संख्या ३०,००० खाटा पेक्षा जास्त झालेली दिसेल असेही आयुक्त म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचा गौरव; भाजपा मात्र सत्ता हलवण्याच्याच प्रयत्नात”- किशोरी पेडणेकरांची टीका

ऑक्सिजनबाबत मुंबई होणार स्वयंपूर्ण!

सध्या देशभरातच विविध रुग्णालयात ऑक्सिजन न मिळण्यावरून रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असून आमच्या सर्व रुग्णालय व जम्बो रुग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे ऑक्सिजन निर्मिती केली जाईल जेणे करून पालिकेला राज्य सरकार व केंद्र सरकारवर ऑक्सिजनसाठी अजिबात अवलंबून राहावे लागणार नाही, असे आयुक्त चहल यांनी सांगितले. याशिवाय ८०० अतिदक्षता विभागातील खाटांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. सर्व नवीन जम्बो कोविड रुग्णालयात सत्तर टक्के खाटा या ऑक्सिजन खाटा असतील तर २०० खाटा अतिदक्षता विभागात असणार आहेत.

“आमच्यावर हसण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?”

मुंबईला सीएसआरमधून ५० कोटींचा मदतनिधी!

मुंबई महानगर पालिकेने पहिल्या व दुसऱ्या लाटेत करोनाचा सामना ज्या परिणामकारकपणे केला त्याची दखल नागपूर व मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई महापालिकेच्या कामगिरीचे कौतुक करताना अन्य राज्यांनी मुंबई महापालिकेप्रमाणे काम करावे अशी सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या व उद्योग समूह मुंबई महापालिकेला करोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई महापालिकेला ‘सीएसआर’ मधून केवळ पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता अवघ्या दोन दिवसांत ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून तीन मोठे उद्योग लवकरच त्यांची मदत जाहीर करणार असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले. यापैकी ३५ कोटी रुपये एकट्या ‘एचडीएफसी’ने जाहीर केले असून यातून ऑक्सिजन प्लांट तसेच वरळीचे जम्बो केविड रुग्णालय उभे केले जाणार आहे. याशिवाय डिझ्ने व स्टार वाहिनीचे माधवन यांनी लंडन येथून दूरध्वनी करून १२ कोटी ५० लाख रुपयांचे ९० व्हेंटिलेटर देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेचे आगामी काळात एकूण ११ जम्बो कोविड रुग्णालये असतील. या रुग्णालयात सुमारे २० हजार खाटा असणार आहेत व ही सर्व रुग्णालये ऑक्सिजन १०० टक्के बाबत स्वयंपूर्ण असतील, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.