मुंबई महापालिकेने वीज बचतीसाठी कृती आराखडा तयार केला असून लवकरच पालिका मुख्यालय आणि रुग्णालयांमध्ये जुन्या उपकरणांच्या जागी नवी उपकरणे बसवून वीज बचतीचा मंत्र जपण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पालिकेच्या अन्य मालमत्तांमध्ये वीज बचतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पालिका इमारतींमधील वीजेची उपकरणे जुनी झाली असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वीज खर्ची पडत आहे. परिणामी पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे. वीज बचतीच्या माध्यमातून पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने ऑडिट करून कृती आराखडा आखण्याचा निर्णय घेतला होता. या कामासाठी नेमलेल्या सल्लागाराने पालिकेच्या मालमत्तांमधील जुनी उपकरणांमुळे वीजेचा अपव्यय होत असल्याचे आपल्या अहवालात नमुद केले आहे. तसेच जुनी उपकरणे बदलण्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील काही उपकरणे आणि केईएम रुग्णालयामधील वातानुकूलित यंत्रणाही बदलण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपप्रमुख अभियंता गु. सु. शरिफ यांनी दिली.