News Flash

मुंबई पालिकेला लस पुरवठादार मिळेना; सर्व ९ निविदा रद्द! आता स्पुटनिक व्ही’साठी प्रयत्न सुरू!

मुंबई महानगर पालिकेच्या लस पुरवठ्यासाठीच्या ग्लोबल टेंडरवर आलेल्या सर्व ९ निविदा रद्द झाल्या आहेत. स्पुटनिक व्ही साठी DRL सोबत बोलणी सुरू आहेत.

मुंबई महानगर पालिकेनं सर्व ९ निविदा केल्या रद्द!

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार मुंबईतील १८ वर्षे वयोगटापुढच्या सर्वांना लस देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने थेट लस पुरवठादारांकडून लस खरेदीची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यात मोठा अडथळा आला असून त्यामुळे मुंबईकरांना लस पुरवठादार मिळण्यात अजून अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेनं लस पुरवठ्यासाठी जारी केलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद म्हणून आलेल्या सर्व ९ निविदा पालिका प्रशासनाने रद्द केल्या आहेत. या निविदांसोबत आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लस पुरवठ्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले असून स्पुटनिक व्हीच्या पुरवठ्यासाठी डॉ. रेड्डीच लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरू असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईला दीड कोटी डोसची आवश्यकता!

मे महिन्यात मुंबई महानगर पालिकेनं करोनाच्या लसीचे एक कोटी डोस मिळवण्यासाठी ग्लोबल टेंडर जाहीर केलं होतं. यासाठी पालिकेकडे एकूण ९ लस पुरवठादारांच्या निविदा सादर झाल्या. यापैकी ८ निविदा या स्पुटनिक व्ही लसीच्या पुरवठ्यासाठी होत्या तर एक निविदा ही फायझर आणि अॅस्ट्राझेनेका लसीच्या पुरवठ्यासाठी होती. मात्र, त्यांनी सादर केलेली कागदपत्र पालिकेच्या निकषांनुसार अपुरी असल्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर पालिकेला १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांना लसीकृत करण्यासाठी एक कोटी डोसची आवश्यकता असून इतर नागरिकांसाठी ५० लाख डोसची गरज आहे.

 

रेड्डीच लॅबकडून स्पुटनिक व्ही मिळणार?

दरम्यान, DRL अर्थात Dr. Reddy’s Laboratories सोबत स्पुटनिक व्ही लसीच्या पुरवठ्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. रेड्डीज लॅबोरेटरीनं स्पुटनिक व्ही लसीचा काही साठा प्रायोगिक तत्वावर पुरवण्याची देखील तयारी दाखवली असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना लस पुरवठ्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात येत्या ८ ते १० दिवसांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

 

मुंबईतल्या आजच्या आकडेवारीनुसार…

एकीकडे महाराष्ट्रातली रुग्णसंख्या कमी होत असताना मुंबईत देखील काही प्रमाणात रुग्णसंख्या खाली येऊ लागल्याचं चित्र आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ९७३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा ७ लाख ९ हजार ९४१ झाला आहे. त्याचवेळी २४ तासांत मुंबईत १२०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात मुंबईत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण करोना मृतांचा आकडा १४ हजार ९८९ झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 9:58 pm

Web Title: bmc twitter corona update all 9 bids for vaccine supply cancelled discussion sputnik v pmw 88
Next Stories
1 “…म्हणून निवडणुकीआधी मेगाभरती केली”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली दोन कारणं!
2 “लसीकरण केंद्रांवरील राजकीय बॅनर्स काढा”; मुंबई मनपा आयुक्तांनी दिला आदेश!
3 “पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा!
Just Now!
X