अच्युत पालव, सुलेखनकार

शाळेत असताना अक्षर चांगले आहे म्हणून फळ्यावर लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. त्यामुळे दुसऱ्यांचे विचार/दुसऱ्यांनी लिहिलेले आपल्याला छानपैकी लिहिता येते इतक्यापुरतेच वाचन मर्यादित होते. त्यामुळे विशेष असे वाचन नव्हते. पण दहावी झाल्यावर जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझे वाचन खऱ्या अर्थाने सुरू झाले. वाचनाला नेमकी दिशा मिळाली. अर्थात ते वाचन ललित साहित्याचे नव्हते तर जाहिरात, कला, सुलेखन अशा माझ्या अभ्यासाशी संबंधित विषयांवरील पुस्तकांचेच विशेषत्वाने होते. जे. जे. कला महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांला असताना रेगे सरांचे ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग-आर्ट अ‍ॅण्ड आयडिया’ हे पुस्तक हातात पडले आणि मी अक्षरश: झपाटला गेलो. माझ्या क्षेत्राची ती बाराखडी, विश्वकोशच होता जणू. यशस्वी आणि अयशस्वी जाहिरातींसह जाहिरात क्षेत्राशी संबंधित सर्व काही त्यात होते. या पुस्तकाचा आजही खूप उपयोग होत आहे. या पुस्तकामुळे ‘जाहिरात’ या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

जाहिरात क्षेत्रातील दिग्गज व सुलेखनकार र. कृ. जोशी हे माझे भारतीय आणि वर्नर स्नायडर हे माझे जर्मन गुरू. त्यांनी केलेले काम पाहणे, अभ्यासणे हे माझे एक प्रकारे ‘वाचनच’ होते. जगातील सुलेखनकार, त्यांचे काम या सर्वाचे संकलन असलेले ‘वर्ल्ड ऑफ कॅलिग्राफी’, तुम्ही वेळी किती प्रकारे लिहू शकता, लिहिण्याच्या विविध शैली याविषयीचे ‘स्पीड बॉल’ हे पुस्तक, कमल शेडगे यांचे ‘कमलाक्षरे’ आणि अन्य मंडळींची या विषयांशी संबंधित पुस्तके वाचली. शेडगे यांचे ‘कमलाक्षरे’ हे पुस्तक म्हणजे उत्तम संदर्भग्रंथ आहे. शब्दांना छान वळण/आकार कसा देता येतो हे यातून शिकायला मिळते. ही सर्व पुस्तके उत्तम मार्गदर्शक आहेत. सध्या उर्दू व अरेबिक भाषेतील एक काम हाती घेतले आहे. त्या भाषांचा माझा अभ्यास नाही व त्या भाषाही कळत नाहीत. पण त्या भाषेतील पुस्तके मी सध्या पाहतो आहे. अक्षरांचे वळण कळण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांच्यावरील काम जेव्हा केले तेव्हा ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’, ‘दासबोध’ आणि या संतांचे अन्य अभंग वाचून काढले. काही कळले नाही तर परत परत वाचून त्यांना काय म्हणायचे आहे, अभंगांतून काय सांगायचे आहे ते समजून घेतले. पुस्तकाचे मुखपृष्ठ करताना त्याचा उपयोग झाला. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे महत्त्वाचे असते. संपूर्ण पुस्तकात लेखकाने जे काही सांगितले आहे त्याचे सर्व सार/मर्म मुखपृष्ठावर आले पहिजे. तसेच ते उठावदार व आकर्षकही झाले पाहिजे. त्यामुळे मुखपृष्ठ करण्यापूर्वी त्या पुस्तकाचे वाचन व अभ्यास आवश्यक आहे. तो या क्षेत्रातील प्रत्येकाने केला पाहिजे. विविध संतांनी विठ्ठलावर जे अभंग रचले आहेत त्यावरील ‘बोलावा विठ्ठल’ या पुस्तकातील अक्षरलेखन, मांडणी, सजावट केली. त्या वेळीही आधी केलेल्या वाचनाचा फायदा झाला. त्यामुळे माझ्या विषयाशी संबंधित असलेल्या पुस्तकांच्या वाचनाने मला विचारांची, कामातील प्रगल्भता तर दिलीच, पण त्याचबरोबर मानसिक समाधान आणि आनंदही मोठय़ा प्रमाणात दिला.

नव्या पिढीने वाचलेच पाहिजे. तुमच्या विषयाशी संबंधित पुस्तकांचे वाचन असो, रोजचे वर्तमानपत्र असो किंवा अन्य विषयांवरील पुस्तकांचे वाचनअसो. तुम्ही जे काम करणार आहात, त्यासाठी या वाचनाचा पुढे नक्कीच फायदा होणार आहे. आज माहितीचे महाजाल, संगणक आणि ‘गुगल’मुळे म्हटले तर काम सोपे झाले आहे. तुमच्यासमोर सर्व काही क्षणार्धात ‘आयते’ येत आहे. या नव्या तंत्रज्ञानाशी संवाद साधा, त्याचा वापरही करा. पण तो फक्त माहिती किंवा संदर्भ इतपतच मर्यादित ठेवा. तुमच्यातील कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, विचार यांना मारू नका. तुमचे समवयस्क किंवा वयाने मोठय़ा असलेल्या व्यक्तींशी बोला, या विषयातील तज्ज्ञ व अनुभवी ज्येष्ठांशी चर्चा करा. आपल्या विषयाशी संबंधित क्षेत्रात जगात काय नवीन चालले आहे, याची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. कारण त्याचा तुम्हालाच तुमच्या कामात उपयोग होणार आहे. त्यामुळे सतत वाचत राहा. आपण जे काम करणार आहोत ते तात्कालिक नसावे तर चिरकाळ टिकणारे असले पाहिजे, असा ध्यास सातत्याने मनाशी बाळगा.