पुणे : राज्यातील सर्वात महत्वाचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघामधून २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये दिवंगत गिरीश बापट यांनी खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा तिसर्यांदा भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे यांना संधी देण्यात आली आहे. या उमेदवारामुळे ही निवडणुक तिरंगी होईल अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्याच दरम्यान पुण्यातील अजित पवार यांचे विश्वासू सहकारी माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना एमआयएमकडून पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही निवडणुक आता चौरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
या उमेदवारी बाबत अनिस सुंडके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील ३० वर्षापासून पुणे शहराच्या राजकीय जीवनात सक्रिय आहे. या कालावधीत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष पद भूषविले आहे. तर स्थायी समितीचा अध्यक्षपदावर होतो. त्यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर विकास काम केली आहे. तर त्यानंतर पत्नी आणि भाऊ हे दोघे ही नगरसेवक राहिले आहे. त्या दोघांच्या काळात अधिकाधिक काम करण्यात आल्याच त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्या कामाची दखल घेऊन एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली आहे. त्या संधीचे नक्कीच मी सोन करेल आणि मी आजवर केलेल्या कामाचा फायदा या निवडणुकीत निश्चित होईल. तसेच पुणे शहरातील प्रत्येक समाजातील घटक माझ्या पाठीशी राहील आणि मला प्रचंड मतांनी निवडून देईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, मागील दहा वर्षात पुण्यासाठी भाजपच्या खासदारांनी एक ही मोठा प्रकल्प आणला नाही. तसेच वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी यासह अनेक प्रश्न या निवडणुकीत भाजपला विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.