रुळांना तडा जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, पेंटोग्राफ तुटणे, गाडीत बिघाड होणे, अशा अरेबियन नाइट्सपेक्षा सुरस कारणांमुळे सदैव गाजणाऱ्या मध्य रेल्वेने सोमवारी या सर्वावर ‘कडी’ केली. कल्याणच्या दिशेला जाणारी कल्याण अर्धजलद गाडी दिव्यावरून रवाना झाली आणि या गाडीच्या दोन डब्यांमधील कपलिंग किंवा कडी निघाल्याने ही गाडी दुभंगली. सुदैवाने या चमत्कारिक प्रकारात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी ऐन संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा मात्र बट्टय़ाबोळ झाला. पण मध्य रेल्वेच्या आमदनीत सर्व प्रकारच्या त्रासाला सरावलेल्या मुंबईकर प्रवाशांनी ‘रेल्वेच्या खात्यात गाडय़ा उशिरा धावण्यासाठी आणखी एक कारण जमा झाल्याचा’ विचार करीत प्रवास चालू ठेवला.
मध्य रेल्वेमार्गावर आठवडय़ातील सातपैकी किमान तीन दिवस तरी तांत्रिक बिघाडांचे कारण देत सेवा उशिराने सुरू असतात. मात्र सोमवारी संध्याकाळी या सर्व तांत्रिक बिघाडांची परिसीमा झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ५.२२ वाजता कल्याणला निघालेली अर्धजलद लोकल ६.१७ वाजता दिव्याला पोहोचली. या गाडीने दिवा स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच १२ डब्यांच्या या गाडीच्या सातव्या व आठव्या डब्याला जोडून ठेवणारे कपलिंग निघाले. त्यामुळे गाडीचे पहिले सात डबे आणि मागचे पाच डबे एकमेकांपासून विलग झाले.
सुदैवाने अशी घटना घडल्यानंतर गाडीमध्ये त्वरित ब्रेक लागण्याची प्रणाली असल्याने गाडीचे दोन्ही भाग जागीच थांबले. या प्रकारामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आणि प्रकरण फक्त वेळापत्रक कोलमडण्यावरच निभावले. या गाडीमागे असलेल्या तीन धीम्या गाडय़ा अडकल्या. त्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक दिव्यापासून डाऊन धीम्या मार्गावरून चालू होती. कल्याणवरून एक डिझेल इंजिन घटनास्थळी रवाना करण्यात आले. या इंजिनाने गाडीचे पुढील सात डबे खेचून कल्याणपर्यंत नेले. तर उर्वरित पाच डबे एका लोकलला जोडून कळवा कारशेडला घेऊन जाण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रवाशाला हानी पोहोचली नसली, तरी असे प्रकार भविष्यात प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतात. रेल्वेने केवळ रेल्वेमार्ग आणि ओव्हरहेड वायर यांच्यावर लक्ष न देता डब्यांमधील तांत्रिक गोष्टीही तपासून घ्यायला हव्यात. तसेच या प्रकरणाची चौकशीही व्हायला हवी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

स्थानकावरील प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल
धीम्या मार्गावर कल्याण लोकल अडकून पडल्यामुळे, मागून येणाऱ्या सर्व लोकल गाडय़ा रांगेत रखडल्या. काय झाले आहे याची कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नसल्याने प्रचंड चीडचीड व्यक्त होत होती. मुंब्रा दिशेने रखडलेल्या गाडय़ा एक तासानंतर दिवा रेल्वे स्थानकाजवळून कल्याण दिशेने जलद मार्गावर वळविण्यात आल्या. मात्र, कल्याणकडे येणारी जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून सुरू झाल्याने फलाटांवर एकच गर्दी उसळली. मात्र, धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविल्यामुळे या गाडय़ांना दिवा, कोपर आणि ठाकुर्लीचा थांबा देण्यात येत नव्हता. त्यामुळे या रेल्वे स्थानकामध्ये उतरणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. त्यांना डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकावर उतरून घर गाठावे लागले.