दोन वर्ष रखडलेल्या मध्य रेल्वेच्या ‘डीसी-एसी’ (डायरेक्टर करंट-अल्टरनेटिव्ह करंट) विद्युतप्रवाह परिवर्तनाचा शनिवारचा मुहूर्तही पुन्हा हुकला असून हे परिवर्तन आता पुढील आठवडय़ात होणार असल्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. विद्युतप्रवाह परिवर्तनानंतर प्रवाशांना होणारा त्रास आणि गैरसुविधांचे कारण पुढे करत शनिवारच्या परिवर्तनाच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
मध्य रेल्वेवरील विद्युत प्रवाह परिवर्तनामध्ये होणाऱ्या दिलंगाईमुळे गाडय़ांचे उशीरा धावण्याचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय नित्याची बाब ठरत आहे. दोन वर्ष काही ना काही कारणांनी लांबणीवर पडणारा हा प्रकल्प आधी २३ मेला राबविण्यात येणार होता. पण त्याही वेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला होता.
अखेरीस शनिवार रात्री हे परिवर्तन होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून जाहिर करण्यात आले. या प्रकल्पानंतर होणाऱ्या तांत्रिक बिघाडावर मात करण्यासाठी काही तयारीची आवश्यकता असल्याचे कारण देत परिवर्तन पुढे ढकलले आहे. परिवर्तनाच्या कामानिमित्त शनिवारी रात्री साडेअकरापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत एकही उपनगरीय सेवा धावणार नसल्याचे यावेळी रेल्वेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. परंतू रेल्वेकडून परिवर्तन पुढे ढकलण्याबाबत वृत्त मिळताच बेस्टने ही सुविधा मागे घेतली आहे.