ठाणे येथील रेल्वे यार्डाच्या आधुनिकीकरणाचे आणि नूतनीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या नाइट ब्लॉक नियोजित वेळेनंतरही सुरू राहिल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडून मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक शुक्रवारी सकाळी विस्कळीत झाली होती. वाहतूक दिवसभर विस्कळीत राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
ठाणे यार्डाचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी पहाटेपर्यंत नाईट ब्लॉक करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही काम सुरू राहिल्याने ठाण्याहून मुंब्य्राकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व सिग्नल्स बंद झाले होते. त्यातच दिवा आणि ठाण्याच्या दरम्यान असलेल्या सिग्नल्समध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद झाले. यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत ठाणे ते दिवा दरम्यानची दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद झाली होती. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत स्वरूपात सुरू राहिली.
पहाटेपासून सुरू असलेला उपनगरी गाडीचा गोंधळ दिवसभर सुरूच राहिला. सकाळी ठाण्यापासून थेट दादपर्यंत धीम्या मार्गावरील फलाटांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. १२ वाजल्यानंतर गर्दी काही प्रमाणात कमी झाली होती. दुपारी जलद मार्गावरील गाडय़ा तब्बल ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. मात्र याबाबत कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात येत नव्हती. काही गाडय़ा अचानक जलद मार्गावरून येत असल्याने ठाणे येथे प्रवाशांची चांगलीच दमछाक होत होती. सायंकाळी उपनगरी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याचा दावा मध्य रेल्वेच्या सूत्रांनी केला.