News Flash

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना नववर्षाचं ‘गिफ्ट’, सीएसएमटी ते कल्याण मार्गावर…

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना नववर्षाचं 'गिफ्ट'

(छायाचित्र सौजन्य - दीपक जोशी )

मध्य रेल्वेवर दाखल झालेली पहिली वातानुकूलित लोकल ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर धावणार असतानाच नवीन वर्षांत  दाखल होणाऱ्या आणखी पाच लोकलचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. यात सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले असून तिच्या २७ फेऱ्या होणार आहेत. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर एकूण सहा वातानुकूलित लोकल येणार असून यातील पहिली लोकल जानेवारी महिन्यात ट्रान्स हार्बरवर धावेल. त्याच्या अप मार्गावर आठ आणि डाऊन मार्गावर आठ अशा १६ फेऱ्या दिवसभरात होतील. यात काही फेऱ्या गर्दीच्या वेळीही आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी एक लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात येईल. तर उर्वरित चार लोकल डिसेंबपर्यंत टप्प्याटप्प्यात येतील. ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक तयार असतानाच सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाचेही वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हार्बरवरही एकच लोकल चालवताना त्याच्या अप मार्गावर सात आणि डाऊन मार्गावर ६ फेऱ्या होतील. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले असून त्यांच्या २७ फेऱ्या होतील, अशी माहिती देण्यात आली. यात डाऊन मार्गावर १५ आणि अप मार्गावर १२ फेऱ्या होणार असल्याचे सांगण्यात आले. एक वातानुकूलित लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवारपासून नवीन वेळापत्रक –

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर १४ डिसेंबरपासून उपनगरी रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमुळे बिघडलेला लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी ४२ लोकलच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. याशिवाय परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी काही फेऱ्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र या वेळापत्रकात हार्बर आणि ट्रान्स हार्बर प्रवाशांसाठी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळी ६.४८ ची कल्याण ते दादर, सकाळी ९.५४ ची टिटवाळा ते ठाणे लोकल आणि स. ११.१७ ची कल्याण ते दादर लोकल परळ स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तर दादर स्थानकातून सुटणारी सकाळी ८.०७ ची कल्याण लोकल परळ स्थानकातून ८.११ वाजता, सीएसएमटी स्थानकातून सकाळी ११.४२ वाजताची कल्याण लोकल परळ स्थानकातून त्याच वेळेत सुटेल, तर दादर स्थानकातून दुपारी १२.३७ वाजता सुटणारी डोंबिवली लोकल परळ स्थानकातून १२.३४ वाजता सुटणार आहे. ठाण्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल फेऱ्यांचा कल्याण, डोंबिवलीपर्यंतही विस्तार केला आहे. बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, टिटवाळा प्रवाशांनाही यातून दिलासा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 12:41 pm

Web Title: central railway first ac local all updates sas 89
Next Stories
1 अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली
2 सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लोकल
3 ४२ उपनगरी रेल्वेफेऱ्यांच्या वेळेत बदल
Just Now!
X