मुंबईत मध्य रेल्वेचा एकही विलगीकरण डबा नाही

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येच सुसज्ज असे विलगीकरण कक्ष तयार के ले. मात्र गेल्या वर्षभरात या विलगीकरण डब्यांचा वापरच झाला नाही. अखेर या विलगीकरण कक्षांचे पुन्हा एक्स्प्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली आहे. मध्य रेल्वेने ४८२ पैकी ४८ डबेच विलगीकरणाचे असून ते मुंबईबाहेर उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेने ३८५ पैकी १२८ डबे मुंबई विभागासाठी सज्ज ठेवले आहेत. परंतु त्यांचा वापर करण्याबाबत राज्य सरकार व पालिकांचा विचार झालेला नाही.

करोना रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. खाटा नसल्याने रुग्णांवर तात्पुरते घरीच उपचार के ले जात असून रुग्णालयात रुग्णांची प्रतीक्षा यादीवरील संख्या वाढतच आहे. करोनाबाधितांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार व्हावे म्हणून  रेल्वे डब्यांचे विलगीकरण डब्यांत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मार्च २०२० च्या अखेरीस घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाच विभागाकडून एकूण ४८२ डब्यांच्या निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निर्मिती केल्यानंतरही आठ महिने त्याचा वापरच झाला नाही. अखेर विलगीकरण डबे पडून राहिल्याने त्याचा प्रवाशांसाठी एक्स्प्रेस डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.

विलगीकरणाच्या डब्यांचा वापर होत नसल्याने ते डबे प्रवासी डब्यांत रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या सहमतीनेच घेतला. सध्या विलगीकरणाचे ४८ डबे असून ते मुंबईबाहेर आहेत. राज्य सरकारने संपर्क साधल्यास मुंबईसह अन्य भागातही त्वरित रेल्वेच्या डब्यांचे विलगीकरण डब्यात रूपांतर के ले जाईल. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे