लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : टाळेबंदीनंतर रेल्वेचा ‘गाडा’ जस रूळावर येऊ लागला तशी लांब पल्लय़ाच्या गाडय़ांमधून पळून येणारी मुले सापडू लागली आहेत. अभ्यासाचा ताण, पालकांशी झालेला वाद अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुला-मुलींनी घरातून पलायन करून रेल्वे स्थानके गाठली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह राज्यातील पाच विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात मिळून १३३ अल्पवयीन मुले-मुली सापडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये ५१ मुलीही आहेत.

अनेक मुले-मुली घरातून पलायन करताच प्रथम रेल्वे स्थानक गाठतात. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर सहजपणे होतो. सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा आणि कन्फर्म तिकीट असणाऱ्यांसाठी मेल-एक्स्प्रेसचा प्रवास आहे. त्यामुळे स्थानकात आलेल्या या मुलांचा संशय पोलिसांना किंवा तिकीट तपासणींसांना येताच अधिक चौकशी करून ताब्यात घेतले जाते.

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रेल्वे सेवा बंद होती. आताही लांब पल्लय़ाच्या गाडय़ांची संख्या मर्यादीत आहे. लोकल प्रवासालाही सर्वाना परवानगी नाही. तरीही लांब पल्लय़ाच्या विशेष रेल्वेगाडय़ांमधून मुंबईत येणारी अनेक अल्पवयीन मुले-मुली रेल्वे स्थानकात सापडली आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर विभागात मिळून अशी ४९ अल्पवयीन मुले सापडली. यात २० मुली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

४९ पैकी २४ अल्पवयीन मुला-मुलींना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले. तर ऊर्वरित २५ जणांना सामाजिक संस्था आणि शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २२ जण सापडले आहेत. पश्चिम रेल्वेच्याही मुंबई ते सूरत, अहमदाबादपर्यंतच्या स्थानकांवर ८४ अल्पवयीन मुले-मुली सापडली असून यामध्ये ३१ मुली आहेत. यातील ६१ जणांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात  आले असून १७ जणांना सामाजिक संस्थेकडे तर ६ जणांना रेल्वे आणि शहर पोलिसांकडे दिल्याचे सांगितले. यातील काही मुले मुंबईतीलही आहेत. काही राज्यातील व राज्याबाहेरीलही आहेत.

घरातून पलायन करण्याची कारणे काय

  • अभ्यासासाठी जबरदस्ती करणे
  • आई-बाबा रागावणे किंवा मारणे
  • रेल्वे गाडय़ांचे, मुंबईचे आकर्षण
  • घरात होणारे वाद-विवाद

अनेक छोटय़ा कारणास्तव अल्पवयीन मुले-मुली घर सोडतात व अन्य ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठतात. अशा मुलांचा संशय येताच रेल्वे पोलिसांकडून चौकशी करुन त्यांना ताब्यात घेऊन व समजूत काढून पालकांच्या स्वाधीन केले जाते.

-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे