करोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. वरळीमधील कोळीवाड्यात करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले असल्याने मुबंई पोलिसांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर सील केला आहे. पोलिसांकडून याठिकाणी त्यासंबंधी उद्घोषणा केली जात असून करोनाचे संशयित रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परिसराचं निर्जुंतुकीकरण सुरु आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स उभारले असून कोणालाही बाहेर येण्यास किंवा आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

करोना व्हायरसने वरळीमधील कोळीवाडा परिसरात शिरकाव केला आहे. येथील चार जणांना करोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामधील एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही किंवा करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले नाहीत. लागण झालेले सर्वंजण ५० हून जास्त वयाचे आहेत.

“यामधील एकजण ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करत होता. त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे. तर इतर तिघे जण स्थानिक ठिकाणी काम करत असून जास्त प्रवास करत नाहीत. त्यामुळे यांना लागण नेमकी झाली कशी याची माहिती घेतली जात आहे,” अशी माहिती जी दक्षिण वॉर्डचे महापालिक सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घेत नसणाऱ्यांबद्दल चिंताग्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “आम्ही लॉकडाउन अजून कठोर करणार आहेत. अनेकदा सांगूनही, आवाहन करुनही लोक ऐकण्यास तयार नाहीत. अजूनही लोक आपल्या घराबाहेर पडत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळत नाही आहेत. आम्ही कोळीवाड्यात निर्जुंतुकीकरण करत असून लोकांनी लॉकडाउनच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. अन्यथा हा व्हायरस अजून पसरत जाईल,” असं ते म्हणाले आहेत.