करोनाग्रस्त व्यक्ती आढळल्याने मुंबईच्या गोरेगाव भागातील बिंबीसारनगर सील करण्यात आले आहे. या भागात अनेक मराठी कलाकार वास्तव्यास आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी हा भाग सील करण्यात आला आहे.

गोरेगावमधील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाई यांसारखे अनेक मराठी कलाकार राहतात. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार मराठीतील दिग्गज कलाकार जयवंत वाडकर यांच्या इमारतीतच करोनाची लागण झालेला रुग्ण आढळला. “इथली परिस्थिती खूप भीषण आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सूचना पाळा”, असं आवाहन त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं.

लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या एका महिलेला करोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर तिच्याच कुटुंबातील आईवडील, भाऊ आणि नोकरलाही या व्हायरसची लागण झाली. कुटुंबातील चारही जणांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिंबीसारनगरात प्रवेशबंदी केली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. मंगळवारी आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आणखी नवीन पाच करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईत १, पुण्यात २ तर बुलढाण्यात २ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.