तीन महिन्यांत क्रेडिट कार्डसंदर्भात १३९ गुन्हे; आतापर्यंत केवळ दोन गुन्ह्यंचा यशस्वी छडा

तंत्रज्ञानातील प्रगती, मोबाइल-इंटरनेट-संगणक वापरकर्त्यांची वाढलेली संख्या आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे वाढते प्रमाण यांमुळे सायबर गुन्हेगारी वाढत असताना या गुन्हेगारीला वचक आणण्यात सुरक्षायंत्रणा मात्र कमी पडत आहेत. मुंबई पोलिसांच्या मासिक अहवालानुसार, चालू वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत नोंदवण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यंपैकी अवघ्या २० टक्के गुन्ह्यंचा छडा लावण्यात मुंबई सायबर गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. तर गेल्या तीन महिन्यांत क्रेडिट कार्डशी संबंधित फसवणुकीच्या १३९ घटना घडल्या असताना यापैकी अवघ्या दोन प्रकरणांचा तपास लावता आला आहे.

मुंबईतील सायबर गुन्ह्य़ाचे प्रमाण वाढत असल्याने सायबर गुन्हे अन्वेषण विभाग स्थापन करण्यात आला. मात्र या विभागाला अद्याप पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात आलेले नाही. आता आणखी सहा ठिकाणी सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्याकरिता केंद्र स्थापण्याचा विचार आहे. विभागाकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघही दिवसागणिक वाढतो आहे. मात्र दाखल झालेल्या अध्र्याहून अधिक प्रकरणांचाही तपास विभागाला करता आलेला नाही.

सायबर गुन्हे विभागाकडे दाखल झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये हॅकिंग, धमकीचे एसएमएस किंवा मेल, मेलद्वारे आणि क्रेडिट कार्डच्या आधारे करण्यात आलेली आर्थिक फसवणूक आदींचा समावेश आहे. मात्र २०१७ साली दाखल झालेल्या १३६१ गुन्ह्य़ांपैकी केवळ १९७ प्रकरणांच्या निष्कर्षांप्रत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या पाच वर्षांमधील सायबर गुन्ह्य़ांचा आढावा घेतल्यास २०१३ साली दाखल झालेल्या १६९ प्रकरणांपैकी ११५ गुन्ह्य़ांचा, २०१४ ला ६०४ पैकी १७७ गुन्ह्य़ांचा, २०१५ ला ९१२ पैकी २२९ गुन्ह्यांचा, २०१६ ला ९२८ पैकी २०३ गुन्ह्य़ांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. हे प्रमाण ५० ते २५ टक्क्यांच्या घरात आहे. थोडक्यात ज्या प्रमाणात सायबर गुन्ह्य़ांची संख्या वाढते आहे, तुलनेत त्यांची उकल करण्याचा वेग वाढलेला नाही. २०१७ मध्ये तीन महिन्यात केवळ १५ टक्के प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात विभागाला यश आले आहे.

जानेवारी ते मार्च, २०१८ या कालावधीत विभागाकडे ४०७ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. त्यापैकी क्रेडिट कार्डमध्ये फसवणूक झालेल्या गुन्ह्य़ांची नोंद सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

या गुन्ह्य़ांपैकी गेल्या तीन महिन्यांमध्ये केवळ २ गुन्ह्य़ाचा छडा लावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुख्य म्हणजे गेल्या तीन महिन्यात ४०७ पैकी ३५ गुन्ह्य़ांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीला विभागामध्ये असलेले अपुरे मनुष्यबळ आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञाच्या कमतरतेला कारणीभूत धरले जात आहे.