दररोज १,२०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारला जाणार आहे. या नव्या प्रकल्पात दररोज १,२०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने याकरिता जागतिक पातळीवरील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाने दिले होते. त्याअंतर्गत पालिकेने याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. गेल्या सात वर्षांपासून पालिका त्याकरिता प्रयत्न करीत आहे.

२०१४ मध्ये एकाच वेळी तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीकरिता पहिल्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र एवढ्या मोठ्या स्तरावर प्रकल्प राबवण्याकरिता कोणी कंत्राटदार पुढे येत नव्हते. त्यामुळे पालिकेने लहान क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते.

त्यापैकी ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. तीनदा निविदा मागवल्यानंतर मे २०१९ मध्ये कंत्राटदार पुढे आले. त्यातून एका कंत्राटदाराची निवड करून गेल्या वर्षी कार्यादेश देण्यात आले होते. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून १२०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याकरिता पालिकेने जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून स्वारस्य अभिरुची प्रस्ताव मागवले आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांना प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

पहिल्या प्रकल्पात ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून दरदिवशी ४ मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी अद्याप ४० महिन्यांचा काळ लागणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका १०५६ कोटी खर्च करणार आहे. तर नव्या प्रकल्पात १२०० ते १८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता असेल. त्याकरिता १०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारल्या जाणारा हा प्रकल्प २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्यात घट

करोना रुग्णसंख्येबरोबरच राज्यातील जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणातही घट होऊ लागली आहे. जुलैमध्ये दर दिवशी सरासरी १०० टनापर्यंत पोहोचलेला एकूण कचरा जानेवारीत ६६ टनांपर्यंत खाली आला आहे. त्यामध्ये कोविड जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण केवळ १९.७८ टन इतके आहे.

करोना संसर्ग वाढू लागला तसे एप्रिल २०२० पासून कोविड जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण दर महिन्यास दुपटीने वाढू लागले. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण दरदिवशी सरासरी ४७ टनांपर्यंत पोहोचले. मात्र ऑक्टोबरपासून त्यामध्ये घट होत असून, जानेवारीत दिवसाला सरासरी १९.७८ टन कोविड जैववैद्यकीय कचरा जमा होऊ लागला.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच इतर वैद्यकीय उपचारांचे प्रमाण घटले. परिणामी इतर जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणदेखील कमी झाले. जून २०२० मध्ये हे प्रमाण करोनापूर्व काळापेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाले होते. जुलैपासून इतर वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार सुरू झाले. या उपचारांदरम्यान वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर वाढल्याने या कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढले. जानेवारीमध्ये इतर जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण करोनापूर्व काळापेक्षा केवळ १० टनांने कमी आहे.

करोनापूर्व काळात राज्यात दिवसाला सुमारे ६० टन जैववैद्यकीय कचरा जमा होत असे. सध्या जानेवारीत कोविड आणि इतर असा दिवसाला सरासरी एकूण ६६.५६ टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ही २४ तासांच्या आत भस्मीकरणाद्वारे लावली जाते. त्यासाठी ७५ किमी परिघात एक अशी भस्मीकरण केंद्रे कार्यरत असून त्यांची एकूण क्षमता प्रतिदिन ७५ टन आहे.

सप्टेंबरमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे अतिरिक्त कचरा हा तळोजा येथील घातक कचरा निर्मूलन केंद्रामध्ये पाठविण्यात येऊ लागला. जैववैद्यकीय कचरा निर्मूलन केंद्रांची क्षमता वाढविण्याचे प्रस्ताव प्रलंबित होते. त्यापैकी काहींना गेल्या वर्षी परवानगी मिळाली, मात्र टाळेबंदीमुळे ते काम रखडले.