मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला साकडे, सर्वच निवडणुका एकत्रित घेण्याची मागणी

राज्यात निवडणुकीत मतदानासाठी सक्ती करता येईल का, याचा निवडणूक आयोगाने विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमात केली. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा आणि सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका एकत्रित झाल्यास यंत्रणांवरील ताण कमी होईल, असा दावा करीत या निवडणुका एकत्रित घेण्याची मागणीही त्यांनी केली. निवडणुकीतील पैशाचा वापर चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

राज्य निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सह्यद्री अतिथीगृहात  ‘लोकशाही, निवडणुका आणि सुप्रशासन’ या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यघटनेने राज्याला जे अधिकार दिले आहेत, त्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी  राज्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी आणि या समितीचा अहवाल सरकारला सादर करावा. त्यायोगे कायद्यामध्ये अपेक्षित बदल करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकशाही बळकटीकरणाकरिता राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ होणे आवश्यक आहे. निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडणे आवश्यक आहे. लोकशाहीबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागली पाहिजे,   निवडणुकीनंतर आपण मतदाराला इतके पैसे वाटले, अशी भाषा उमेदवारांकडून कानी येते. पैशाचा हा वापर थांबलाच पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीला निवडणूक लढण्यापासून रोखले पाहिजे, असेही ते म्हणाले. लोकशाही बळकट करणासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या प्रक्रियेत युवकांना सामावून घेणे ही काळाची गरज असून वाढत्या मोबाइल वापराचा उपयोगही त्यासाठी निवडणूक आयोगाने करावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन कायदा करणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले.

काही लोक धोरणात्मक बाबींवर नेहमी बोलत असतात. परंतु ते मतदानाला जात नाहीत. त्यामुळे मतदान सक्तीची गरज आहे.   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांच्या मदतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.     – राज्यपाल सी. विद्यासागर राव