जळगाव महापालिकेला नऊ कोटींचे अनुदान

रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा राबविण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खात्याने जळगाव महानगरपालिकेसाठी सोमवारी पावणे नऊ कोटींचे विशेष अनुदान मंजूर केले. विविध आरोपांमुळे बदनामी सहन करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याकरिताच मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या जळगाववर कृपादृष्टी दाखविल्याची मंत्रालयात चर्चा आहे.

रस्ते आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासाकरिता महानगरपालिकांना विशेष अनुदान शासनाकडून मंजूर केले जाते. यानुसारच जळगाव महानगरपालिकेला नगरविकास खात्याने रस्त्यांसाठी पावणेचार कोटी तर पायाभूत सुविधांकरिता पाच कोटी असे एकूण ८.७५ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आली. खडसे यांच्या निकटवर्तीयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन महिने लक्ष होते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केल्याने खडसे भलतेच संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला साधी कल्पनाही दिली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. आरोप झाल्यावर विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश बापट यांना मुख्यमंत्र्यांनी अभय दिले, पण आपल्याबद्दल संशय व्यक्त केल्याने खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. खडसे संतप्त झाल्याने तसेच त्यांनी पक्षनेतृत्वाकडे तक्रार केल्यानेच बहुधा खडसे यांना मुख्यमंत्र्यांकडील गृह खात्याने रविवारी अभय दिले. तसेच दाऊदच्या दूरध्वनीबाबत आरोप करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे यांचा राग अधिक शांत करण्याकरिताच बहुधा जळगाव महापालिकेला विशेष अनुदान मंजूर केले असावे, अशी भाजपमध्ये चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध आरोपांमुळे संतप्त झालेल्या खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते.