एकीकडे मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता असताना धारावीमधील करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने धारावीतील बालिका नगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धारावीतील या रुग्णाला २३ मार्चपासून ताप येत होता. २६ मार्च रोजी त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, काहीच फरक न पडल्याने २९ मार्च रोजी त्याला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला करोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रुग्ण राहात असलेल्या परिसरातील आठ इमारतींमधील ३०८ सदनिकांमधील नागरिकांना घऱाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर वरळी कोळीवाडा येथील ८६ नागरिकांना पोद्दार रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३३५ वर पोहोचली आहे. मंगळवारी एकट्या मुंबईत ५९ रुग्ण आढळले होते. धारावीसाख्या दाटीवाटीच्या वस्तीतही करोना रुग्ण आढळल्याने त्याचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आता आरोग्य यंत्रणांसमोर आहे. दरम्यान मुंबईतील १९१ विभाग हे करोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते आणखी काही कठोर उपाय योजणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharavi coronavirus patient dies in sion hospital sgy
First published on: 02-04-2020 at 00:48 IST