मालेगाव-धुळ्याहून सुमारे १५० पथके मुंबईत

मुंबईत सध्या अनेक गणेशोत्सव मंडळांना डीजे-ढोलपथकांबरोबरच जर कुणी वेड लावले असेल तर ते आहे, ब्रास-बॅण्डने. कल्याण, बदलापूर, उल्हासनगर अशा लगतच्या परिसरात ब्रास बँडला पसंती दिली जात आहे. त्यासाठी धुळे, मालेगाव येथून शेकडो ब्रास बँड पथक कल्याणमध्ये दाखल झाले असून ढोल आणि डीजेपेक्षा हा पर्याय स्वस्त आणि वेगळा असल्याने मंडळांची या पथकांना पसंती लाभते आहे. त्यामुळे, गावाकडून केवळ गणेशोत्सवात मुंबईत येणाऱ्या या पथकांची संख्या वाढते आहे.

मालेगाव, धुळे येथील अतिदूर्गम भागातून साधारणपणे १५० ब्रास बँड पथक कल्याण, उल्हासनगर, बदलापूर लगतच्या काही ग्रामीण भागात गेल्या १० दिवसांपासून मुक्कामी आहेत. फक्त  १५-२० दिवसांसाठी ही पथके शहरात ४ ते ५ हजार रुपयांत भाडय़ाची खोलीत राहतात. चार ताशे, दोन मोठे ढोल, तीन-चार ध्वनीक्षेपक, टेम्पो असे सर्व सामानसुमान आणि  दोन गायक आणि १०-१२ वाजंत्री असे प्रत्येक पथकात असतात. आपल्या राहत्या गावापासून तब्बल १५-२० तास या सर्व साहित्यांनिशी प्रवास करुन ही पथके कल्याण भागात मुक्कामी येतात. गणेश आगमन वा विसर्जन मिरवणुकांमध्ये या पथकांना वाजविण्यासाठी सुपारी दिली जाते. डीजे-ढोलपथकांपेक्षा या पथकांची बिदागी कमी आहे. त्यामुळे मंडळांना ती परवडतातही. यात दोन गायक टेम्पोवर चढून सुरात गात असतात. तर इतर वाजंत्री या सुरांवर ढोल आणि ताशाचा ठेका धरतात. दोन गायक लोकांच्या मागणीनुसार गाणी गातात. सध्या सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्याला सर्वात जास्त पसंती आहे. या गाण्याची फर्माईश किमान ७-८ वेळा केली जाते. पथकात एकही महिला गायक नसल्याने महिलेचा आवाजही आम्हालाच काढावा लागतो, असे एका पथकातील गायक दीपक म्हस्के यांनी सांगितले.

मुंबईत कारवाईची भीती

गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा आम्ही आपापल्या गावी जावून लग्न समारंभात किंवा लहानशा कार्यक्रमात बँड वाजविण्याचे काम करू. सध्या आम्ही तीन-चार तास वाजवण्यासाठी १५ हजार रुपये घेतो. मात्र एखादे मंडळ आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसल्यास १० हजार रुपयेही घेतो. गावी जाण्यापूर्वी खर्चाचा हिशोब करुन उरलेले पैसे एकमेकांना वाटून घेतो. मुंबई आणि ठाणे शहरात देखील जायची इच्छा आहे. परंतु, ठराविक वेळेनंतर वाजविल्यास पोलिस कारवाई करत असल्याने आम्ही याच भागाला पसंती देतो.

– सय्यद अफसर अली रेहमान अली, जय भारत ब्रास बँड, जळगाव.