मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यातील हद्दीचा वाद नवीन नसला, तरी कोकणात जाणाऱ्या पहिल्यावहिल्या डबलडेकर वातानुकूलित गाडीच्या पहिल्याच फेरीला या वादाने ग्रहण लावले. या गाडीच्या इंजिनवर असलेल्या मध्य रेल्वेच्या चालकाने ‘म.रे.’च्या हद्दीबाहेरील रोह्य़ापुढे गाडी चालविण्यास नकार देत कोकण रेल्वेच्या इंजिन चालकाने ही कामगिरी पार पाडावी, असा हट्ट धरला. त्यामुळे तब्बल एक तास गाडी रोहा स्थानकातच उभी राहिली. रोहा स्थानकात गाडीच्या परिचालनासंबंधी सर्व कर्मचारी बदलले जावेत, अशी सूचना मध्य रेल्वेने दिल्याचे मध्य रेल्वे सांगत आहे. तर नियमाप्रमाणे इंजिन चालक रत्नागिरीला बदलला जातो, असे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
मध्य व कोकण रेल्वे यांनी बऱ्याच खटपटीनंतर यंदाच्या गणेशोत्सवात कोकण मार्गावर वातानुकूलित डबलडेकर गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनसहून वाजतगाजत ही गाडी निघाली. ठाण्याला प्रवासी संघटनांनी गाडीचे स्वागतही केले. ही गाडी सकाळी साडेआठच्या सुमारास रोहा स्थानकात पोहोचली आणि या गाडीच्या इंजिन चालकाने त्यापुढे गाडी न नेण्याचा पवित्रा घेतला. आपल्याला या स्थानकापर्यंतच गाडी चालवण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे या इंजिन चालकाचे म्हणणे होते. अखेर कोकण रेल्वेने आपला इंजिन चालक पाठवून ही गाडी करमाळीकडे रवाना केली. विशेष म्हणजे या प्रीमियम गाडीसाठी जादा दराने तिकिटे खरेदी करूनही प्रवाशांना  खोळंबावे लागले.
२०१२मध्ये कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांनी ठरवलेल्या नियमावलीनुसार या मार्गावर चालणाऱ्या गाडय़ांचे इंजिन चालक आणि गार्ड रत्नागिरी स्थानकात बदलले जातील, असे ठरले होते. त्यामुळे या प्रकरणी हद्दीचा वाद होण्याची काहीच शक्यता नव्हती. मात्र तरीही मध्य रेल्वेच्या इंजिन चालकाने गाडी रत्नागिरीपर्यंत नेण्यास नकार दिला.

पहिल्या दिवशी १३५ प्रवासी
कोकण रेल्वेमार्गावर शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर रेल्वे गाडीला पहिल्या दिवशी चाकरमान्यांचा ठंडा प्रतिसाद मिळाला. या मार्गावर धावणाऱ्या अन्य रेल्वे गाडय़ांच्या तिकीट दराच्या तुलनेत या वातानुकूलित डबलडेकरचे प्रवासी भाडे काही पट जास्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची गर्दी सुरू झाली असूनही सुमारे बाराशे प्रवाशांची क्षमता असलेली ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी आली त्यावेळी गाडीत एकूण सुमारे फक्त १३५ प्रवासी होते

मध्य रेल्वेच्या सूचनेप्रमाणे कोकण रेल्वेने आपला गार्ड रोहा स्थानकात पाठवला. मात्र, ऐनवेळी इंजिन चालकानेही गाडी चालवण्यास नकार दिला.
वैशाली पतंगे, कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी

पूर्ण गाडीचा परिचालन कर्मचारी वर्ग रोहा येथे बदलण्यात यावा, अशी आगाऊ सूचना मध्य रेल्वेने कोकण रेल्वेला केली होती. कोकण रेल्वेने रोहा स्थानकात गार्डबरोबरच इंजिन चालकही बदलणे आवश्यक होते.
– ए. के. जैन, मध्य रेल्वेचे
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी