मुंबई : ‘अंदर से आवाज आ रही है. रोना बंद करो और दुआ करो। इन्शाअल्लाह सब जिंदा बाहर आएंगे. किसी को खरोच भी नही आएगी,’.. ‘केसरभाई मेन्शन’खाली दबल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देणारे हे शब्द सातत्याने ऐकायला येत होते. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींचे काय झाले, या विचारानेच हंबरडा फोडणारे रहिवासी आणि त्यांना सावरणारे नातेवाईक या दोघांचा धीर दिवस मावळू लागल्यानंतर मात्र खचू लागला.

हुमा आणि अमीर आझाद यांचे कुटुंब केसरभाईच्या समोरील इमारतीत राहते. हुमाची मुलगी कशफ (१३) आणि धाकटय़ा मुलाची तब्येत एकाच वेळी बिघडली. कशफला सारखा ताप येत होता. त्यामुळे तिला केसरभाईत राहणाऱ्या आईच्या घरी ठेवण्यात आले होते. हुमाची बहीण शाहिन कामावर जाण्यासाठी निघाली, तेव्हा इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आईकडे तिने स्कूटरची चावी मागितली. आईने फेकलेली चावी खाली येते न येते तोच इमारत कोसळली. शाहिनने हा प्रसंग डोळ्यांनी पाहिला. ती जीव वाचवण्यासाठी पळाली खरी, पण काही सेकंदांनंतर भाची कशफ, आई आणि भाऊ या तीन जिवाभावाच्या व्यक्ती आत अडकल्याची जाणीव तिला झाली आणि तिने हंबरडा फोडला.

संध्याकाळपर्यंत या दोघींना, त्यांच्या कुटुंबांना सगळे व्यवस्थित होईल असा धीर देण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी केला. पण संध्याकाळी बचाव पथकाने कशफचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर मात्र रहिवासी, नातेवाईक बधिर झाले. या कुटुंबाप्रमाणे सात ते आठ कुटुंबांची नातेवाईक मंडळी आशेवर होती. काहींना संसार गमावूनही आपली व्यक्ती वाचल्याचे समाधान होते, तर काहींनी संसारही गमावला आणि व्यक्तीही.

तीन महिन्यांची आयेशा बचावली

देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीप्रमाणे इमारतीत राहणाऱ्या शेख कुटुंबातली तीन महिन्यांची आयेशा बचावली. तिच्या आईचा मृत्यू झाला. वडील, काका आणि अन्य नातेवाईक जखमी झाले. आयेशाच्या इवल्याशा शरीरावर एकही ओरखडा नव्हता. तिच्या भोवती जमलेल्या नातेवाईक महिलांचे चेहरे दु:खी, कष्टी असले तरी निशाणपाडा मार्गावरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नातेवाईकांच्या घरात बांधलेल्या पाळण्यात आयेशा मस्त हसत, खिदळत होती. कदाचित आईच्या ओळखीचा, हक्काचा गंध ती शोधेल आणि रडेलही.

अरुंद गल्ल्यांमुळे यंत्रांविना बचावकार्य

तिन्ही बाजूंना असलेल्या इमारती, समोरच्या बाजूला असलेली अवघी तीन फुटांची गल्ली, त्यापुढे पुन्हा इमारतींची रांग आणि अशात जागच्या जागी कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा या परिस्थितीमुळे केसरभाई मेन्शन इमारतीखाली दबल्या गेलेल्यांना बाहेर काढताना बचाव यंत्रणांच्या नाकीनऊ आले. दुचाकीलाही जायला जागा नसलेल्या या परिसरात ढिगारे उपसणारी यंत्रे नेणे कठीणच होते. त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेल्या बचावपथकांना मानवी मदतीवरच भर द्यावा लागला. त्यातच इमारत कोसळल्यापासून त्या ठिकाणी बचावकार्य करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या अयोग्य पद्धतीमुळे बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले.