९००० गावांत पाणीटंचाई; ८७१ छावण्यांमध्ये पाच लाख जनावरांना आसरा
राज्यात विशेषत: ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता आत्तापासूनच अधिक जाणवू लागली आहे. अनेक गावांचे जलस्रोत आटल्याने पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आजमितीस नऊ हजार ६६० गावपाडय़ांमध्ये तीन हजार ७०० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
अनेक जिल्ह्य़ांत जनावरांच्या चारापाण्याची समस्याही गंभीर असून ८७२ छावण्यांमध्ये तब्बल पाच लाख २४ हजार जनावरांनी आसरा घेतला आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळांनी ग्रामीण भागातील लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरू असताना सरकार आणि विरोधक मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत तर प्रशासन निवडणूक कामात मग्न असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे राज्यात निर्माण होणारी संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबर महिन्यातच १५१ तालुके आणि २६८ मंडळात दुष्काळ जाहीर केला होता. तर लोकांच्या मागणीनंतर दुसऱ्या टप्प्यात ९३१ गावांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी ४५१८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. केवळ या गावांत दुष्काळ जाहीर करून न थांबता या गावांमध्ये जमीन महसूल करात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ अशा अनेक सुविधा आणि शेतीच्या नुकसानीपोटी थेट मदत देत निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बळीराजाला बळ देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. मात्र उन्हाच्या झळांमध्ये सरकारच्या या उपाययोजना कमी पडू लागल्या असून अनेक जिल्ह्यांतून आपलीही गावे दुष्काळी जाहीर करण्याची मागणी नव्याने येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असून जनावरांनाही चारापाण्यासाठी सरकारी छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.
परिस्थिती काय?
आजच्या घडीस २८७९ गावे आणि सहा हजार ७८१ अशा नऊ हजार ६६० गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. भूजल पातळी खाली घेल्याने तसेच जलस्रोत कोरडे पडू लागल्याने विहिरी आणि बोअरवेलमधूनही पाणी मिळणे मुश्कील होत असल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
छावण्यांमध्ये वाढ..
सध्या अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या जिल्हय़ांत ७८२ छावण्या सुरू झाल्या असून तेथे पाच लाख २४ हजार ३६८ जनावरे ठेवण्यात आली आहेत. बीड जिल्हय़ात सर्वाधिक दुष्काळ असून तेथे ५१५ छावण्या सुरू असून मराठवाडय़ातून छावण्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी होत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.