पूल बांधणीचे काम ११७ दिवसांत पूर्ण करत भारतीय लष्कराने सामर्थ्याची झलक दाखवली आहे. लष्कराकडून उभारण्यात आलेले परळ ते एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पुलाचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या पूलाचे उद्घाटन करण्यात आले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अरुंद पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २२ प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला होता. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्रालयाने परळ ते एल्फिन्स्टन रोड स्थानकाला जोडणारा पूल, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील पादचारी पुलांचे काम तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. हे काम लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

लष्कराकडे पूलबांधणीचे काम दिल्याने यावर टीका देखील झाली होती. लष्कराने ११७ दिवसांत एल्फिन्स्टन रोड स्थानकातील व अन्य दोन पुलाचे काम पूर्ण केले आहे.  या तीनही पूलाचे जानेवारी २०१८ पर्यंत उभारण्याचे उद्द्ष्टि लष्कराने ठेवले. मात्र काही अडचणींमुळे त्यांची कामे पूर्ण होण्यास उशिर झाला होता. मंगळवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला जाताना फडणवीस व गोयल यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास केला.

एल्फिन्स्टनमधील पुलामुळे जवळपास १ लाख ६० हजार प्रवाशांना लाभ होणार आहे. या पुलाची लांबी ७३.१ मीटर तर रुंदी ३.६५ मीटर इतकी आहे. या पुलावर १०. ४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.