देशातील मोदीलाटेचे प्रतिबिंब राज्यातही उमटण्याची चिन्हे असून बहुतांश मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. मोदीलाटेत सत्ताधारी काँग्रेस आघाडीची पीछेहाट होणार असून मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या मनसेची पाटी मात्र कोरी राहणार असल्याचे या चाचण्यांतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला या चाचण्यांनी राज्यात एक जागा बहाल केली आहे. या चाचण्यांमुळे पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही हाच कल राहण्याची शक्यता आहे. साधारपणे सहा महिने आधीच्या निकालाचा परिणाम राहतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे असते. एकूणच आघाडीसाठी कठीण काळ आहे.
राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांचे महत्त्व वाढावे म्हणून राष्ट्रवादीने १२ पेक्षा जास्त जागाजिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात सर्वच चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीच आलेख गतवेळच्या तुलनेत घसरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सर्वच संस्थांनी राष्ट्रवादीला गतवेळच्या आठपेक्षा कमीच जागा दाखविल्या आहेत. मोदी यांना पाठिंबा देण्याचे जाहीर करून ११ जागा लढणाऱ्या मनसेचे खाते उघडू शकत नाही. कोणत्याच चाचण्यांमध्ये मनसेचा भोपळा फुटणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.